‘आजचे स्टार्टअप नवा इतिहास लिहून भारताला स्पर्धात्मक बनवेल’: प्रा. अजय कुमार सूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 08:04 IST2026-03-22T08:04:11+5:302026-03-22T08:04:11+5:30
आयआयटी मुंबईत ‘भारत इनोव्हेट्स’ प्री-समिटला प्रारंभ

‘आजचे स्टार्टअप नवा इतिहास लिहून भारताला स्पर्धात्मक बनवेल’: प्रा. अजय कुमार सूद
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आजचे स्टार्टअप नवा इतिहास लिहिणार असून, भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. त्यांनी संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग यांच्यातील सुसंवाद अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांनी केले.
आयआयटी मुंबई येथे शनिवारी ‘भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट’चा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी स्टार्टअप उद्योजक आणि विद्यार्थ्यांना सूद यांनी मार्गदर्शन केले. देशभरातील अग्रगण्य स्टार्टअप्सनी या व्यासपीठावर आपापल्या अत्याधुनिक नवकल्पना सादर करत भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची झलक दाखविली. कार्यक्रमाला उच्चशिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर, आयआयटी मुंबईचे बोर्ड ऑफ गव्हनर्न्सचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन तसेच आयआयटीचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. राधाकृष्णन यांनी स्टार्टअपसना भारताचे नवीन राजदूत बनण्याचे आवाहन केले, तर डॉ. जोशी यांनी शिक्षण प्रणालीला नवोन्मेषाशी जोडण्यावर भर दिला.
पहिल्याच दिवशी
७० प्रकल्पांचे सादरीकरण प्री-समिटमध्ये गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि धोरणकर्ते सहभागी झाले असून, स्टार्टअप्सना थेट गुंतवणूकदारांसमोर सादरीकरणाची संधी मिळाली. पहिल्या दिवशी ७० हून अधिक स्टार्टअप्सनी विविध पिचिंग सत्रांमध्ये आपले प्रकल्प मांडले. या उपक्रमामुळे भारतातील डीप-टेक परिसंस्थेला चालना मिळत असून आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय स्टार्टअप्सची मजबूत ओळख निर्माण होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.