Join us

"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 16:43 IST

Bala Nandgaonkar News: महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ते एकत्रितपणे लढणार का? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ते एकत्रितपणे लढणार का? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच असं घडल्यास मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलतील, असे दावेही केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी एक मोठं आणि सूचक विधान केलं आहे.

मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या शक्यतेवर भाष्य करताना बाळा नांदगावकर म्हणाले की, मनसेने आतापर्यंत निवडणुका ह्या  एकट्याने लढवलेल्या आहेत. त्यामुळे आताही वेळ आली तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू शकतो. बाळा नांदगावकर यांच्या या विधानामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात होणाऱ्या युतीबाबत काहीशी साशंकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, यावेळी बाळा नांदगावकर यांना सामनामधील रोखठोक या सदरामध्ये लिहिलेल्या लेखाबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये काय लिहिले होते, हे अजून वाचलेलं नाही. युती होणार की नाही याबाबत मला माहिती नाही. त्याबद्दल राज ठाकरे हे बोलतील. पक्षाचे प्रमुख हे आमच्यापेक्षा एक हजार फूट अधिक पुढे असतात. पक्षाचं हित कशात आहे, हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

५  जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जवळपास २० वर्षांनंतर एकत्र आले होते. त्यामुळे आता या मनोमीलनानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे राजकीयदृष्ट्या एकत्र येऊन युती करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पुढच्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींनंतर युतीबाबतच्या चर्चांवर कुणीही काही बोलू नये, असे सक्त आदेश पक्षाचे प्रवक्ते आणि नेत्यांना दिल्याने या युतीबाबत तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. 

टॅग्स :बाळा नांदगावकरमनसेशिवसेनाराज ठाकरेउद्धव ठाकरे