आजपासून एसी लोकलचे तिकीट महागले; प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 10:30 IST2019-06-01T02:56:11+5:302019-06-01T10:30:17+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वात पहिली एसी लोकल २५ नोव्हेंबर २०१७ रोजी बोरीवली ते चर्चगेट मार्गावर चालविण्यात आली. तेव्हापासून तिच्या तिकीट दरांत वाढ करण्यात आली नव्हती

आजपासून एसी लोकलचे तिकीट महागले; प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री
मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून एसी लोकलच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. याआधी एसी लोकलचे तिकीट प्रथम श्रेणीच्या तिकीट दरांपेक्षा १.२ पटीने आकारले जात होते. मात्र आता १.३ पटीने आकारण्यात येणार आहे.
नव्या दरानुसार, चर्चगेट ते विरार एसी लोकलच्या एका तिकिटासाठी प्रवाशाला २०५ रुपये किमतीवरून २२० रुपये मोजावे लागणार आहेत. तिकिटाची किंमत कमीत कमी ६५ रुपयांपासून ते जास्तीत जास्त २२० रुपये असणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वात पहिली एसी लोकल २५ नोव्हेंबर २०१७ रोजी बोरीवली ते चर्चगेट मार्गावर चालविण्यात आली. तेव्हापासून तिच्या तिकीट दरांत वाढ करण्यात आली नव्हती. उन्हाळ्यात प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने एसी लोकलद्वारे जास्त उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसी लोकलचे थांबे वाढविले आहेत.
३१ मेपर्यंत मासिक, त्रैमासिक पास काढलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे जादा दर आकारले जाणार नाहीत. मात्र, या प्रवाशांची पासची मुदत संपल्यानंतर सुधारित पास नवीन तिकीट दरानुसार खरेदी करावा लागणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रवाशांनी दिली.
चर्चगेट ते प्रभादेवी - ६० ऐवजी ६५ रुपये
चर्चगेट ते वांद्रे - ८५ ऐवजी ९० रुपये
चर्चगेट ते जोगेश्वरी - १२५ ऐवजी १३५ रुपये
चर्चगेट ते बोरीवली - १६५ ऐवजी १८० रुपये
चर्चगेट ते भाईंदरसाठी - १७५ ऐवजी १९०
चर्चगेट ते विरारसाठी - २०५ ऐवजी २२० रुपये
चर्चगेट-विरार पास
१ आठवडा - १ हजार ७० रुपयांऐवजी १ हजार १५० रुपये
२ आठवडे - १ हजार ५५५ रुपयांऐवजी १ हजार ६८० रुपये
मासिक पास - २ हजार ४० रुपयांऐवजी २ हजार २०५ रुपये