पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 06:30 IST2025-10-26T06:29:45+5:302025-10-26T06:30:03+5:30
आरोपी कारचालकाला तीन दिवसांनी अटक

पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
मुंबई : पबमध्ये ओळख झालेल्या २८ वर्षीय तरुणीसोबत फोन कॉलवरून वाद झाल्यानंतर एका ३७ वर्षीय व्यावसायिकाने संतापाच्या भरात तिचा मोबाइल काढून घेतला. मोबाइल परत मिळवण्यासाठी ती त्याच्या कारच्या बोनेटवर चढली असता, आरोपीने गाडी सुसाट वेगाने चालवली. त्यामुळे तरुणी खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २५) पहाटे बोरिवली पश्चिम येथे डॉन बॉस्को शाळेजवळील फायर ब्रिगेड गेट परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनीत धिया (३७) याला अटक केली आहे.
जखमी तरुणी आणि विनीत धिया यांची ओळख बोरिवलीतील एका पबमध्ये झाली होती. दोघेही त्याच परिसरातील रहिवासी असल्याने पबमधून बाहेर पडल्यावर आरोपीने तिला घरी सोडण्याची ऑफर दिली. कारमध्ये बसल्यानंतर तरुणीला आलेल्या एका फोन कॉलवरून दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात विनीतने तिचा मोबाइल हिसकावून घेतला, त्यावरून शिवीगाळ आणि बाचाबाची झाली. तरुणीनेही आरोपीला मारहाण केली. घटनेची माहिती गोराईचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना सकाळी साडेसहाच्या सुमारास कार्यकर्त्यांनी दिली. त्यांनी तातडीने बोरिवली पोलिसांना संपर्क साधला आणि रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणीला कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.
मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली पण...
पीडित तरुणी ही बोरिवलीच्या आयसी कॉलनीमध्ये असलेल्या एका स्पामध्ये नोकरी करत आहे. तिचे नाव चांगनू हॅशसिंग आहे. ती २२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता काम उरकून तिचे सहकारी नना आणि अन्य मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. हॉटेलचे नाव तिच्या लक्षात नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. विनीतसोबत तिची या हॉटेलमध्ये भेट झाल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन मित्रांचीही त्याने या तरुणीशी ओळख करून दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ ११चे पोलिस उपायुक्त संदीप जाधव आणि सहायक आयुक्त प्रकाश बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोपी कारचालकाचा शोध घेत त्याला बोरिवलीतून अटक केली. मधुसूदन नाईक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बोरिवली पोलिस ठाणे