एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:17 IST2025-07-22T07:16:58+5:302025-07-22T07:17:11+5:30

मुंबई विमानतळावर लँडिंगच्या वेळी एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये विमानाचे तीन टायर फुटले असून, विमानाच्या इंजिनलाही फटका बसला आहे.

Three tires of Air India plane burst; plane skidded off runway due to rain while landing at airport | एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली

एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली

मुंबई : कोचीहून मुंबईविमानतळावर लँडिंगच्या वेळी एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये विमानाचे तीन टायर फुटले असून, विमानाच्या इंजिनलाही फटका बसला आहे. मात्र, यामध्ये प्रवासी आणि केबिन कर्मचारी सुरक्षित आहेत. मुसळधार पावसामुळे हे विमानाने धावपट्टी सोडली, मात्र काही वेळात विमान पुन्हा धावपट्टीवर आणण्यात वैमानिकाला यश आले. 

सोमवारी सकाळी एअर इंडियाचे एआय२७४४ हे एअर बस कंपनीचे विमान मुंबई विमानळाच्या ९/२७ या मुख्य धावपट्टीवर उतरत होते. त्यावेळी विमानतळावर मुसळधार पाऊस सुरू होता. विमान उतरतेवेळी विमानाचा वेग ताशी २४० किलोमीटर इतका होता. धावपट्टीवर काही प्रमाणात पाण्याचा थर असल्यामुळे विमानाची चाके घसरल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत पुन्हा ते विमान धावपट्टीवर आणले. मात्र, विमानतळाच्या मुख्य धावटपट्टीचेदेखील काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद 
मुख्य धावपट्टी दुरुस्ती आणि देखभालीसाठी काही काळ बंद करण्यात आली होती. त्या दरम्यान वाहतुकीला फटका बसू नये याकरिता १४/३२ ही दुसरी धावपट्टी कार्यान्वित करण्यात आली. 
ही घटना घडताच विमानतळावरील आपत्कालीन यंत्रणा तातडीने कार्यान्वित झाली आणि त्यांनी या घटनेवर नियंत्रण मिळविल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

मुसळधार पावसाचा विमानसेवेला फटका
मुसळधार पावसाचा विमानसेवेलाही फटका बसला. अनेक विमानांचे विलंबाने उड्डाण झाले. एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट, अकासा या सर्व कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करत विमानाची वेळ तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच विमानतळावरील दृष्यमानता कमी झाल्यामुळे विमानसेवेला विलंब झाला.

Web Title: Three tires of Air India plane burst; plane skidded off runway due to rain while landing at airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.