मुंबईत ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्या, पावसाळ्यात खबरदारी म्हणून उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:16 IST2025-05-21T16:16:03+5:302025-05-21T16:16:41+5:30
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक महापालिका मुख्यालयात मंगळवारी झाली. बैठकीत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या कार्यवाहीची माहिती दिली.

मुंबईत ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्या, पावसाळ्यात खबरदारी म्हणून उपाययोजना
मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कोणत्याही घटनेसाठीचा प्रतिसाद म्हणून शहर भाग तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगर येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची (एनडीआरएफ) प्रत्येकी एक तुकडी तैनात असणार आहे. तसेच आपत्ती प्रसंगी या तुकडीला घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी विशेष मार्गिका (ग्रीन कॉरिडॉर) वाहतूक पोलिसांनी तयार करून द्यावा, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक महापालिका मुख्यालयात मंगळवारी झाली. बैठकीत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या कार्यवाहीची माहिती दिली. या बैठकीला महापालिकेच्या विविध खात्यांचे खातेप्रमुख आणि मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय हवामान खाते, भारतीय तटरक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, वाहतूक पोलिस, म्हाडा, एस.आर.ए., एमएमआरडीए, बेस्ट, टाटा पॉवर, अदानी एनर्जी आदींच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालिकेच्या सूचना
पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून पंप आणि डिझेल जनरेटर संच बसवण्याचे नियोजन करावे.
मॅनहोलची झाकणे खुली राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
रेल्वे परिसरामध्ये पाणी साचून उपनगरीय लोकल वाहतूक विस्कळीत होणार नाही, यासाठी रेल्वे आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाने संयुक्तपणे काम करावे.
विविध प्राधिकरणांच्या अखत्यारितील जागेवरील जाहिरात फलक सुस्थितीत असल्याबाबत संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची खात्री करावी.
ज्या फलकांसाठीचे संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही, अशा फलकांचा परवाना रद्द करावा.
मोबाइल टॉवरच्या अनुषंगानेही संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत.