मुंबई : दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन कुटुंबातील वादातून रविवारी तिघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अरविंद गुप्ता, राम गुप्ता आणि हमीद शेख अशी हत्या झालेल्यांची नावे असून याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवत एमएचबी पोलिस पुढील तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील गणपत पाटील नगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या शेख व गुप्ता कुटुंबियाविरुद्ध २०२२ मध्ये परस्परविरूद्ध गुन्हे दाखल होते. तेव्हापासून त्यांच्यात वैमनस्य आहे. गणपत पाटील नगर गल्ली नंबर १४ च्या रस्त्यावर असलेल्या राम नवल गुप्ता यांच्या नारळ विक्री स्टॉलसमोर शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास हमीद शेख हा दारू पिऊन आला आणि त्यांच्यात वाद सुरु झाले. दोघांनी आपापल्या मुलांना बोलावले.
यावेळी गुप्ता आणि त्यांची मुले अमर, अरविंद, अमित आणि हमीद नसिरुद्दीन शेख आणि त्यांची मुले अरमान व हसन यांच्यामध्ये हाताने व धारदार शस्त्राने मारामारी झाली. या हाणामारीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांची पळापळ सुरू झाली.
घटनेची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
गणपत पाटील नगरमध्ये तणावाचे वातावरण, चौघे जण जखमीया हल्ल्यात राम नवल गुप्ता (वडील) व अरविंद गुप्ता हे मृत्युमुखी पडले असून अमर व अमित गुप्ता गंभीर जखमी झाले आहे. तसेच हमीद शेख (वडील) याचाही मृत्यू झाला असून मुलगा अरमान व हसन जखमी झाले आहेत. मृतदेह शताब्दी हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहेत. दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. आरोपी जखमी असल्याने अटक बाकी असल्याचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.