साडेतीन किलो सोन्याची पेस्ट जप्त, मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:04 IST2023-05-17T14:04:01+5:302023-05-17T14:04:22+5:30
सोन्याची पेस्ट करून त्याद्वारे तस्करी करण्याची ही गेल्या दोन महिन्यांतील चौथी घटना आहे.

साडेतीन किलो सोन्याची पेस्ट जप्त, मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई
मुंबई : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत असून, केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मंगळवारी साडेतीन किलो सोन्याची पेस्ट पडकली आहे. याप्रकरणी दोन भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी २३ लाख रुपये इतकी आहे.
सोन्याची पेस्ट करून त्याद्वारे तस्करी करण्याची ही गेल्या दोन महिन्यांतील चौथी घटना आहे. डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई येथून १५ मे रोजी ईके-५०० या विमानाने येणारे दोन प्रवासी सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला होता. विमान मुंबई दाखल झाल्यानंतर या दोन प्रवाशांना बाजूला घेत त्यांच्या सामानाची तपासणी केली असता प्लास्टिकच्या चार पाऊचमध्ये ही सोन्याची पेस्ट त्यांनी लपविली होती.
या पेस्टचे वजन साडेतीन किलो आहे. अलीकडेच डीआरआयने सोने तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. मंगळवारी पकडण्यात आलेले सोने हे याच तस्करी रॅकेटचा भाग आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.