प्रेयसीच्या कुटुंबाची धमकी, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीमुळे घटनेचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:13 IST2026-03-18T08:13:16+5:302026-03-18T08:13:55+5:30
भैयासाब भीमराव व्हावळे (३२) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

प्रेयसीच्या कुटुंबाची धमकी, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीमुळे घटनेचा उलगडा
मुंबई : जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू, अशी धमकी प्रेयसीच्या कुटुंबियांनी दिल्याने मुंबई पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या घटनेचा उलगडा झाला असून त्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला. भैयासाब भीमराव व्हावळे (३२) असे मृत पोलिसाचे नाव आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील भीमराव व्हावळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार मुलगा भैयासाब यांची ७ फेब्रुवारी, २०२६ रोजी मुंबई पोलिस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते कलिना प्रशिक्षण केंद्र येथे प्राथमिक प्रशिक्षण घेत होते. १५ मार्चला सकाळी कलिना प्रशिक्षण केंद्रातून भैयासाब यांचा अपघात झाला असून ताबडतोब मुंबईला या, असा निरोप आला होता. त्यानुसार भीमराव यांनी नातेवाईकांसह मुंबई गाठली. त्यावेळी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले तसेच खिशामध्ये आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.
...म्हणून आत्महत्या: माझे नांदेडच्या हादगावमध्ये राहणाऱ्या दिव्या जाधव या मुलीशी प्रेमसंबंध होते. तिच्या वडिलांनी तुला खतम करतो. तिच्या आईनेही धमकी दिली. जीव दे नाहीतर नोकरी घालवतो, अशी धमकी देत आहेत. त्यामुळे आत्महत्या करतोय, असे भैयासाबने मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिले आहे.
तज्ज्ञांची मदत घेणार! : वाकोला ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे. प्रेयसीच्या पालकांवर गुन्हा नोंदवला आहे. चिठ्ठीतील अक्षर हे मुलाचेच असल्याचे भैयासाब यांच्या वडिलांनी सांगितले आहे. मात्र, तरीही फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे अधिकारी म्हणाले.