Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 10:04 IST

उद्धव ठाकरेंनी राज्यातील तीन पक्षीय महायुतीवरही निशाणा साधला

मुंबई - शिवसेनेतील बंडखोरीला वर्ष झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एका बंडखोर आमदार, खासदारांवर निशाणा साधला. तर, दुसरीकडे विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपने एनडीएची बैठक घेतली. त्यावरून ठाकरेंनी मोदींना डिवचले. शिवसेना खासदार आणि संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली. त्यावेळी, राज्यातील आणि देशातील राजकारणावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. तसेच, इर्शाळवाडी दुर्घटना आणि मणीपूर हिंसाचारवरुनही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी, मोदी सरकारला लक्ष्य केलं. आता, भाजपनेही उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

उद्धव ठाकरेंनी राज्यातील तीन पक्षीय महायुतीवरही निशाणा साधला. यावेळी, महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी भाष्य केलं. मात्र, महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का ? त्याकडे लक्ष द्या, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत मोदींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या, असा खोचक सल्लाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.  

आत्मनिर्भर भारतसाठी युती

आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी 5 दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण, २०२४ साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

मुंबई महापालिकेवरुनही टीका

३० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल. 

टॅग्स :उद्धव ठाकरेचंद्रशेखर बावनकुळेभाजपा