यंदा आधारशिला अभ्यासक्रम! अंगणवाडी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अंमलबजावणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:51 IST2025-06-02T14:50:25+5:302025-06-02T14:51:15+5:30

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून तीन ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे ३० लाख बालकांसाठी ही नव्या शिक्षणाची नांदी ठरणार आहे.

This year, the foundation curriculum will be implemented to improve the quality of Anganwadi education. | यंदा आधारशिला अभ्यासक्रम! अंगणवाडी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अंमलबजावणी करणार

यंदा आधारशिला अभ्यासक्रम! अंगणवाडी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अंमलबजावणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आता नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये पोषण, आरोग्यसेवा आणि लसीकरण यांसोबत मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्यासाठी राज्यातील १.१० लाख अंगणवाड्यांमुळे ‘आधारशिला बालवाटिका’ या नावाने सुधारित अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून तीन ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे ३० लाख बालकांसाठी ही नव्या शिक्षणाची नांदी ठरणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या अनुषंगाने राज्य सरकारने अंगणवाड्यांसाठी आधारशिला बालवाटिका १, आधारशिला बालवाटिका २ आणि आधारशिला बालवाटिका ३ या नावांनी सुधारित अभ्यासक्रम राबवण्याला मान्यता दिली आहे. महिला व बाल विकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शक पुस्तिका आणि साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जवळच्या शाळेत स्थलांतर होणार

सरकारने या अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या अंगणवाड्या भाड्याच्या किंवा अपुऱ्या इमारतींमध्ये आहेत, त्या जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. विशेषतः ज्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग चालतो; पण तीन वर्षांची बालवाटिका नाही, अशा ठिकाणी अंगणवाड्या एकत्र केल्या जातील. यामुळे बालकांचे शिक्षण अधिक सलग आणि अखंड राहण्यास मदत होणार आहे.

या वर्षी होणार अमंलबजावणी

वर्ष    इयत्ता

  • २०२५-२६    १ ली
  • २०२६-२७    २ री ते ४ थी व ६ वी
  • २०२७-२८    ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी
  • २०२८-२९    ८ वी, १० वी व १२ वी


शैक्षणिक साहित्याचा वापर

बालकांच्या शिक्षणाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी ‘जादुई पिटारा’, ई-पिटारा, आधारशिला किट्स, नवचेतना आणि प्री-स्कूल एज्युकेशन किट्स यांसारख्या शैक्षणिक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे.

Web Title: This year, the foundation curriculum will be implemented to improve the quality of Anganwadi education.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.