"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 09:05 IST2025-11-24T09:02:38+5:302025-11-24T09:05:35+5:30
Raj Thackeray BMC Election: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेबद्दल मोठं भाकित केलं आहे. मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, असे ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
Raj Thackeray BMC Election News: राज्यात पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. नंतरच्या टप्प्यात राज्यातील महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष तयारीला लागले असून, मुंबई महापालिकेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसांना गाफील राहिलात तर ही मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक असेल, असे सांगत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मतदारयांद्यावर लक्ष ठेवा असे आवाहनही केले. त्याचबरोबर मुंबई महापालिका हातातून गेली तर त्या लोकांचे थैमान आवरता येणार नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेवर डोळा
कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मला जाता जाता फक्त एवढीच गोष्ट सांगायची आहे की, रात्र वैऱ्याची आहे. गाफील राहू नका. आजुबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं राजकारण आता सुरू आहे आणि मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे. ज्या प्रकारे आता मतदारयाद्यांतून सुरू आहे, याच्यावर लक्ष ठेवा."
"आपल्या आजुबाजूला कोण मतदार खरे आहेत, खोटे आहेत; यावर देखील तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. आवश्यक आहे. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की, मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ही शेवटची महानगरपालिका निवडणूक असेल", असे विधान राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना केले.
गाफील राहू नका, थैमान सुरू होईल
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, "जर आपण गाफील राहिलो, तर महापालिका हातातून गेली म्हणून समजा. त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे मग ते कुणालाच आवरता येणार नाही. मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की, कुठेही गाफील राहू नका", असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
मनसे- महाविकास आघाडी
मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसे सामील होणार की नाही, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यावरून मुंबईच्या राजकारणात जोरात चर्चा सुरू आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
मनसेबद्दल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पण, मनसेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यास शरद पवार सकारात्मक असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मनसे-महाविकास आघाडी होणार की नाही, याबद्दल तूर्त तरी चर्चाच आहेत.