"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:24 IST2025-12-20T15:23:00+5:302025-12-20T15:24:23+5:30
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरेंना घेरलं आहे.

"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी एका नेत्याच्या प्रवेशावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. सुरुवातीला "हा कुठला रशीद मामू आहे?" असा सवाल करत अमित साटम यांनी त्यांच्याबद्दल गंभीर आरोप केले आहेत. 'आपण आपल्या मतांच्या लांगुलचालनासाठी देशविघातक, देशविरोधी शक्तींना ताकद देत आहात, हे सिद्ध होत आहे', असा हल्ला अमित साटम यांनी ठाकरेंवर केले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे नेते अंबादास दानवेही उपस्थित होते.
शिवसेनेच्या अकाऊंटवरून या पक्षप्रवेशाचे फोटो पोस्ट करण्यात आले. ही पोस्ट रिट्विट करत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हा कुठला रशीद मामू आहे? असा सवाल सुरूवातीला केला.
अमित साटम यांनी दुसरी पोस्ट केली. त्यात ते म्हणाले की, "हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर धार्मिक तेढ निर्माण करून दंगली पेटवण्याची याचिका दाखल झाली होती आणि ज्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले होते. त्यामुळे आपण आपल्या मतांच्या लांगुलचालनासाठी देशविघातक, देशविरोधी शक्तींना ताकद देत आहात, हे सिद्ध होत आहे. मुंबईकर आपल्याला नक्कीच धडा शिकवतील", असा इशारा त्यांनी ठाकरेंना दिला.
अमित साटम यांनी रशीद मामू यांचा एक व्हिडीओही पोस्ट केला. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला रशीद मामू यांनी विरोध केला होता, असे साटम यांनी म्हटले आहे. 'छत्रपती संभाजीनगरला विरोध करणारा हाच तो मामू ज्याला तुम्ही पक्षात घेतले आहे', असे म्हणत अमित साटम यांनी ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
छत्रपती संभाजी नगरला विरोध करणारा हाच तो मामू ज्याला तुम्ही पक्षात घेतले आहे.@OfficeofUT@ShivSenaUBT_https://t.co/vy4QPVHrjlpic.twitter.com/bleL9ZQDM4
— Ameet Satam (@AmeetSatam) December 20, 2025
यापूर्वीही अमित साटम यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी ममदानी निवडून आल्यानंतर एक पोस्ट केली होती. त्याचा मुंबई महापालिकेशी संबंध जोडला होता. "ज्या प्रकारे काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलतोय, काही महापौरांची आडनावं पाहिली आणि महाविकास आघाडीचा व्होट जिहाद बघितला, तर मुंबई संदर्भात सावध राहण्याची आवश्यकता वाटते..! मुंबई वर जर कोणी 'खान' लादण्याचा प्रयत्न केला, तर सहन केला जाणार नाही!", असे म्हणत अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर निशाणा साधला होता.