देवाच्या चित्राचे पैसे घेत नसतात, छत्रपतींचं तैलचित्र रेखाटणारे जी. कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 06:52 PM2020-07-22T18:52:22+5:302020-07-22T22:21:41+5:30

दिल्लीत 1960 साली "मुघल ए आझम"चित्रपटाची जी कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून एलिझाबेथ राणीने आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती.

They don't take money for the picture shivaji maharaj, they draw the oil picture of Chhatrapati. G kamble | देवाच्या चित्राचे पैसे घेत नसतात, छत्रपतींचं तैलचित्र रेखाटणारे जी. कांबळे

देवाच्या चित्राचे पैसे घेत नसतात, छत्रपतींचं तैलचित्र रेखाटणारे जी. कांबळे

googlenewsNext

मुंबई - सिनेमा पोस्टरच्या दुनियेतला सम्राट, कला पंढरीचा वारकरी, कोल्हापूर भूषण आणि पोस्टरचा बादशहा अशा विविध विशेषणांनी चित्रकार आणि पोस्टर ए आझम जी. कांबळेंचं नाव घेतलं जातं. जी कांबळेंचा जन्म 22 जुलै 1918 मध्ये अत्यंत गरीब कुटुंबात कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत जन्म झाला, जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कांबळेंना चित्रकलेची बालपणापासून प्रचंड आवड, जी पुढेही त्यांनी जोपासली. चित्रकलेच्या आवडीला त्यांनी बारीक निरीक्षण, स्वविचार आणि निर्माणशील मनाने प्रचंड मेहनत घेऊन तेही चित्रकलेचे कोणतेही प्राथमिक शिक्षण नसताना व कोणत्याही मान्यवर चित्रकाराचे मार्गदर्शन नसताना आपल्या अंगभूत गुणांवर एका उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी साकारलेल्या चित्रांमुळेच कलाक्षेत्रात त्यांना स्वतः चे स्थान निर्माण करता आले, त्यातूनच पोस्टर पेटिंगचा बादशहा म्हणून त्यांनी भारतभर सन्मान मिळवला हेही आश्चर्यच म्हणावे लागेल. 

दिल्लीत 1960 साली "मुघल ए आझम"चित्रपटाची जी कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून एलिझाबेथ राणीने आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती. भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता आली तिचा पाया यांनीच घालून दिला पोस्टर पेंटिंगला अभिजात कले सारखा दर्जा प्रतिष्ठा आणि जागतिक किर्ती मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांनी पोट्रेट पेंटींगच्या क्षेत्रातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. 

जी कांबळे यांनी सतत पाच वर्षे अभ्यास आणि ऐतिहासिक चिंतन करुन 1974 साली बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल तैलचित्राला शासनाचे अधिकृत चित्र म्हणून राजमान्यता मिळाली आहे. त्यावेळी मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री होते. छत्रपतींच्या या चित्राची तत्कालीन शासनाने रॉयल्टी देऊ केली होती. पण, देवाचे चित्र काढण्यासाठी पैसे घ्यावयाचे नसतात म्हणून त्यांनी ती स्वीकारली नाही. मुंबई सचिवालय, महाराष्ट्र विधान भवन, मंत्रालय, विधान परिषद सभागृह, नागपूर विधानभवन, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कॅन्सस विद्यापीठ अमेरिका अशा अनेक ठिकाणी त्यांची तैलचित्र लागली आहेत, अमेरिकेतही त्यांची चित्रप्रदर्शनं भरली होती.

भारत सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व राजश्री शाहू महाराज यांचे चित्रावरूनच पोस्ट स्टॅम्प प्रकाशित केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. संतुजी लाड, पंडित जवाहरलाल नेहरू, अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी, रशियन नेते लेनिन, लाल बहादुर शास्त्री, रवींद्रनाथ टागोर, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, स्व. मीनाताई ठाकरे अशा अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय थोर नेत्यांची, व्यक्तीची पोट्रेट पेंटिंग बनवण्याचा मानही जी कांबळेंना मिळाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अशा अनेक मान्यवरांनी, नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित केले आहे. तर लोकनेते शरदचंद्र पवार यांच्याहस्ते कोल्हापूर भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, त्यांच्यावर अनेक वृत्तपत्रातून लिखाण करण्यात आले आहे. चित्रकार जी कांबळे यांचे दुःखद निधन झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख साहेब यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. 

कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतून मुंबईकडे पळून आलेल्या गरीब हिंदू खाटीक कुटुंबातील मुलाने पोस्टर पेटींगचा बादशहा बनून स्वत:चे नाव कलाविश्वात अजरामर केले. 21 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले. आपल्या ब्रशच्या फटकांऱ्यांनी महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला आणि कलाविश्वाला आपलसं केलं. मात्र, शासनदरबारी आज ज्यांनी रेखाटलेली तैलचित्रे दिमाखात दिसतात, पण ही चित्रे रेखाटलेल्या जी कांबळे यांच्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचं राज्यातील हिंदू खाटीक समाजाचं म्हणणं आहे. या अजरामर कलाकाराला मरणोत्तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणीही राज्यातील हिंदू खाटीक समाजाच्या संघटना आणि शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.

Web Title: They don't take money for the picture shivaji maharaj, they draw the oil picture of Chhatrapati. G kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.