"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:00 IST2026-01-13T08:00:40+5:302026-01-13T08:00:40+5:30
सर्वात जास्त जागांवर आम्ही उमेदवार दिले असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
जयंत होवाळ
मुंबई : भाजपने मुंबईवर सतत अन्याय केला आहे. मुंबईची वाताहत केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने आम्ही सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवर घेरले आहे. आमची आघाडी सत्तेत येऊ शकते. आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही, असा दावा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत केला.
काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील?
गायकवाड : मागच्या वेळी आम्ही ३१ जागा जिंकल्या होत्या, या वेळेस त्यात आणखी वाढ होईल. आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही.
म्हणजे काँग्रेस आणि वंचित सत्तेत येऊ शकत नाही का?
गायकवाड: का नाही येऊ शकत? दोन्ही पक्ष एकदिलाने निवडणूक लढवत आहोत. सर्वात जास्त जागांवर आम्ही उमेदवार दिले आहेत.
वंचित आणि तुमच्यात मात्र बेबनाव दिसत आहे. दोघांचा जाहीरनामाही स्वतंत्र प्रसिद्ध झाला आहे.
गायकवाड : वंचितने काही सूचना केल्या होत्या. त्याचा अंतर्भाव आम्ही जाहीरनाम्यात केला. आणखी काही मुद्दे वंचितला वेगळे वाटले. त्यासाठी त्यांनी त्यांचा जाहीरनामा काढला. त्यात बिघडले कुठे? विचारधारा तर एकच आहे ना?
या निवडणुकीत मुंबई काँग्रेसकडे चेहरा आहे का?
गायकवाड : वर्षा गायकवाड चेहरा होऊ शकत नाही का? मी बाबासाहेबांची अनुयायी आहे. खासदार आहे. गेले काही दिवस आम्ही मुंबईकरांचे प्रश्न उचलून धरत आहोत.
जागावाटपाबाबत तुमचा आणि वंचितचा शेवटपर्यंत घोळ सुरू होता?
गायकवाड : युतीत काही तडजोडी कराव्या लागतात. वंचितकडे काही जागांवर उमेदवार नव्हते. त्या जागांवर आम्ही उमेदवार दिले. निवडणुकीत छोट्या-मोठ्या अडचणी येत असतात. त्या सामंजस्याने सोडविल्या जातात.
वंचितशी युती करण्याआधी तुमची 'एकला चलो रे'ची भूमिका होती?
गायकवाड: हो, होती. पण त्यानंतर वंचितची आणि आमची विचारधारा जुळली आणि आघाडी झाली. ऐन वेळेसही अशा घडामोडी होऊ शकतात. मुळात समान विचारधारा असणारे पक्ष कधीही एकत्र आले तर, काय बिघडले? आम्ही राष्ट्रवादी (शरद पवार) कडेही आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता, पण ते उद्धवसेना आणि मनसेसोबत गेले. मनसेची विचारधारा आम्हाला मान्य नव्हती, म्हणून आम्ही त्या युतीत गेलो नाही. या निवडणुकीनंतरही वंचित आणि आमची आघाडी कायम राहणार आहे.
मुंबईकरांनी तुम्हाला मते का द्यावीत?
गायकवाड : आम्ही सातत्याने सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार चव्हाट्यावर मांडत आहोत. गेल्या तीन वर्षात पालिकेची वाट लावली, त्याचा पर्दाफाश करत आहोत. पालिका रुग्णालयांची दुरवस्था समोर आणत आहोत. बेस्टची वाताहत कशी झाली, ते सांगत आहोत. भाजप त्यांच्या मित्रांना मुंबईतील जमिनी कशा वाटत आहे, ते उघड करत आहोत. जात-धर्म यापलीकडे जाऊन आम्ही फक्त मुंबईचे प्रश्न आणि विकास हाच मुद्दा मांडत आहोत. भाजप मुंबईवर अन्याय करत आहे, हे लोकांना पटवून देत आहोत.
कोणीही बडा नेता तुमच्या प्रचारात दिसत नाही?
गायकवाड : दिल्लीहून काही नेते आले आहेत. भले आमची जाहीर सभा झाली नसेल, पण गल्लीबोळात जाऊन आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आहे. त्या पद्धतीने कामे सुरू आहेत.