"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 10:14 IST2025-12-17T10:14:00+5:302025-12-17T10:14:52+5:30
Municipal Corporation Elections in Maharashtra: भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने महापालिका निवडणुकीत कुठे युती, कुठे स्वबळ याबद्दलचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या महापालिकांमध्ये, तिन्ही पक्षांची वेगवेगळी समीकरणे ठरली आहेत.

"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
"महानगरपालिका निवडणूक म्हणजे वाटे केले गेले लुटण्याचे", असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महायुतीकडून वेगवेगळ्या महापालिकांमध्ये घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. 'मैत्रीपूर्ण लढत' ह्या वाक्याचा अर्थ आम्हाला नाही बाबा कळला फडणवीसजी, असा उपरोधिक सवालही दमानियांनी केला आहे.
मुंबई, ठाणे, पुणे महापालिका निवडुकीसंदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढणार आहेत. तर पुण्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. यावरूनच अंजली दमानियांनी काही मुद्दे मांडले.
अंजली दमानिया म्हणाल्या, "महानगरपालिका निवडणूक म्हणजे वाटे केले गेले लुटण्याचे. मुंबई मनपामध्ये भाजप लुटणार. ठाण्यात शिंदे गट लुटणार आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र येऊन लुटणार."
मुंबईत भाजपला शिंदेंची गरज
"भाजपला मुंबईत ठाकरेंविरुद्ध लढायला शिंदेंच्या समर्थनाची गरज आहे, त्या बदल्यात त्यांना ठाणे देऊन टाकले आणि अजित पवारांना पिंपरी चिंचवड लुटायला मिळावी म्हणून मुंबई महापालिका सोडण्याचे ठरवले. मग एक कारण द्यायचं म्हणून नवाब मल्लिकांना आणून बसवले. मग हे कारण देऊन त्यांना बाहेर?", असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
"राष्ट्रवादी तर कमालच आहे. विधानसभेत विरोधात पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र? मैत्रीपूर्ण लढत, ह्या वाक्याचा अर्थ आम्हाला नाही बाबा कळला फडणवीसजी", असा टोला दमानियांनी फडणवीसांना लगावला आहे.
"पिंपरी चिंचवडला आम्ही एकत्र लढलो तर मतांची विभागणी होईल??? कशी ते सांगा फडणवीस? आम्हाला नाही कळले?", अशी टीका अंजली दमानियांनी केली आहे.
मुंबईत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेच्या जागावाटपाचं काय?
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची जागावाटपाबद्दलची पहिली बैठक मंगळवारी झाली. यात भाजपने १३० ते १४० जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे. भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला ८० ते ९० जागा देण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबईत राष्ट्रवादीला दूर करण्याचा प्रयत्न
मुंबईमध्ये भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे, हाच मुद्दा भाजपने राष्ट्रवादीला युतीतून दूर ठेवण्यासाठी पुढे केला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.