लाचारी दिसून येतेय, 'जाणता राजा'वरुन नवाब मलिकांची उदयनराजेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 20:40 IST2020-01-14T20:39:58+5:302020-01-14T20:40:04+5:30

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे जाणता राजा उपमा देताना विचार करावा

There seems to be helplessness, nawab malik critics on udayanraje bhosale | लाचारी दिसून येतेय, 'जाणता राजा'वरुन नवाब मलिकांची उदयनराजेंवर टीका

लाचारी दिसून येतेय, 'जाणता राजा'वरुन नवाब मलिकांची उदयनराजेंवर टीका

मुंबई - महाराष्ट्रात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन चांगलच वादंग सुरू आहे. त्यात, भाजपा नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली. उदयनराजेंच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंना टोला लगावत, होय शरद पवार हे जाणता राजा आहेत, असे म्हटले. त्यानंतर, आता कामगारमंत्री नवाब मलिक यांनीही नाव न घेताल उदयनराजेंना लक्ष्य केले. 

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे जाणता राजा उपमा देताना विचार करावा, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली होती. तसेच, अनेकांना जाणता राजाची उपमा देतात, त्याचाही मी निषेध करतो. जाणता राजा उपमा देताना विचार करण्याची गरज असल्याचेही उदयनराजेंनी म्हटले होते. उदयनराजेंच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला. 'होय शरद पवार हे जाणता राजाच' असे ते म्हणाले. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न, प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेत" असे आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यानंतर, आता नवाब मलिक यांनीही जाणता राजाबद्दल मत व्यक्त करत उदयनराजेंना लक्ष्य केलं.

जाणता राजा हे कधीही पवारसाहेबांनी स्वत:ला लिहिलेलं नाही. जाणता राजा या शब्दाचा अर्थ म्हणजे कुठेतरी ज्याला सगळ्या विषयाची जाण असते. पण, पक्षाने कधीही त्या शब्दाचा वापर केला नाही, लोकं त्याबाबतीत सांगतात. पण, थेट योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली जाते. जयभगवान गोयल भाषणात सांगतात, आता पुस्तक रिलीज होतंय. त्याची निंदा न करता, तुम्ही इतरांवर बोट दाखवताय. म्हणजे, स्पष्ट रुप पद्धतीने त्यांची लाचारी दिसून येते, असे म्हणत मलिक यांनी उदयनराजे भोसलेंवर नाव न घेता टीका केली.

Web Title: There seems to be helplessness, nawab malik critics on udayanraje bhosale