रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार?; उद्धव ठाकरेंनी कालच घेतली होती भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 15:36 IST2024-03-10T15:31:26+5:302024-03-10T15:36:55+5:30
रवींद्र वायकर आज सायंकाळी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार?; उद्धव ठाकरेंनी कालच घेतली होती भेट
मुंबई: जोगेश्वरी येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले शिवसेनाउद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज सायंकाळी रवींद्र वायकर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे कालच उद्धव ठाकरेंनी जोगेश्वरीत जाऊन रवींद्र वायकर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पक्षांतरासाठी रवींद्र वायकर यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप केला होता. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा, पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा, असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.
शिवसेनेची ही ऊर्जा, ताकद, निष्ठा आहे, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या जोगेश्वरी ठाकूर नगर येथील शिवसेना शाखा क्र. ७३ च्या भेटीदरम्यानची.
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 9, 2024
ह्यावेळी त्यांनी स्थानिक शिवसैनिकांची भेट घेऊन, त्यांच्यासोबत संवाद साधला. pic.twitter.com/DjPcKUEadD
कोण आहे रवींद्र वायकर?
रवींद्र वायकर मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण आता हेच निकटवर्तीय शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.