कुठेतरी कमी पडत असेन म्हणून संधी नाही; रोहित पवारांचे वक्तव्य, नाराजीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 07:15 IST2025-03-04T07:14:19+5:302025-03-04T07:15:13+5:30
शरद पवार गटाची बैठक झाली, या बैठकीला ना रोहित पवार उपस्थित होते ना त्यांना कोणती मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे रोहित पवार नाराजी असल्याची चर्चा आहे.

कुठेतरी कमी पडत असेन म्हणून संधी नाही; रोहित पवारांचे वक्तव्य, नाराजीची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पक्षाकडून जबाबदारीचे पद मिळत नसल्यामुळे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच सोमवारी रोहित पवारांनी केलेल्या विधानामुळे त्यांची नाराजी उघड झाली आहे. रोहित पवारांनी केलेल्या एका ट्विटमुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली होती.
या चर्चेबाबत विधान भवनाच्या आवारात माध्यमांनी विचारले असता, मला पक्षाने जबाबदारी दिली नाही म्हणून मी नाराज असल्याचा विषय येत नाही. माझे एकच मत आहे, आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत. लढले पाहिजे. राहिला प्रश्न जबाबदारीचा तर कदाचित सात वर्षांत कुठेतरी मी कमी पडत असेन असे काही नेत्यांना वाटत असावे म्हणून त्यांनी त्याबाबत निर्णय घेतला नसेल किंवा काही महत्त्वाचे निर्णय उद्या घ्यायची गरज असेल, त्या वेळेस तो निर्णय होईल. पण, नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मागील आठवड्यात शरद पवार गटाची बैठक झाली, त्या बैठकीत रोहित पवार यांच्यावर पक्षांतर्गत मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही. या बैठकीला ना रोहित पवार उपस्थित होते ना त्यांना कोणती मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे रोहित पवार यांची पक्षातील नेत्यांवर नाराजी असल्याची चर्चा आहे.
‘दिग्गज नेतेही लोकांच्या बाजूने बोलत नाहीत’
मी विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना विनंती करतो. त्यामध्ये अनेक दिग्गज आणि अनुभवी नेते आहेत. पण, आज सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने फार कमी नेते बोलताना दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज नाराज आहे. त्यात मीसुद्धा नाराज आहे, असे बोलायला हरकत नाही, असेही रोहित पवार म्हणाले.