गद्दारांना माफी नाही, मुंबईत पाऊल कसं ठेवताय बघूच; एकनाथ शिंदेंवर शिवसैनिक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:18 IST2022-06-21T16:10:24+5:302022-06-21T16:18:41+5:30
आजच्या बैठकीत ३३ आमदार होते, पक्ष हा पक्ष असतो असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

गद्दारांना माफी नाही, मुंबईत पाऊल कसं ठेवताय बघूच; एकनाथ शिंदेंवर शिवसैनिक संतापले
मुंबई - राज्याच्या राजकारणात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिंदे यांनी बंड पुकारत नॉट रिचेबल झाले. हिंदुत्वाची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे यांना गटनेटे पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.
तर दुसरीकडे वर्षावरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शिवसेना भवनावर जमण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता हळूहळू शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरूवात झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शिवसैनिक म्हणाले की, गद्दारांना शिवसेनेत माफी नाही. ते मुंबईत कसं पाऊल ठेवताय हे बघूच. विधानभवनात त्यांना यायवच लागेल असं शिवसैनिक म्हणाले त्याचसोबत उद्धवसाहेबांनी आदेश द्यावे या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरूवात #Shivsenapic.twitter.com/HfySgEyQyL
— Lokmat (@lokmat) June 21, 2022
आजच्या बैठकीत ३३ आमदार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. पक्ष हा पक्ष असतो, शिवसेना आमदारांच्या कुटुंबाच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. गैरसमज झाले असतील तर मुंबईत चर्चेला यावं. आम्ही कुणाचे निरोप घ्यायला बसलो नाही. गुजरातमध्ये गेलेले आमदार मुंबईत परतल्यानंतर ते शिवसेनेत परततील असा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री राजीनामा देणार?
सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.