"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 18:24 IST2025-05-22T18:22:26+5:302025-05-22T18:24:47+5:30
Uddhav Thackeray : सेलेबी नास कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आल्यानंतर मुंबईतील अनेक कामगार बेरोजगार झाले होते. त्यांना भारतीय कामगार सेनेने मध्यस्थी करून दुसऱ्या कंपनी रोजगार मिळवून दिला.

"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
Uddhav Thackeray Latest News: सेलेबी नास या कंपनीसोबतचा करार रद्द केल्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी गंभीर विधान केले. 'संपूर्ण राजकारण्यांची जी खेळी आहे, मला भीती हीच वाटत होती की, एक निमित्त करून कंपनीला तोडायचं, कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तिथे लावायची', असे ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर कुणी लचके तोडणार असेल, तर त्यांचे राजकारणात तुकडे करण्याचं ठरवू, असा इशारा त्यांनी दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीच्या कंपन्यांवर बंदी घातली आहे. याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड हॅन्डलिंगचे काम करणाऱ्या तुर्कीच्या सेलेबी नास कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला.
या कंपनीतील ३७०० कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की ओढवली होती. भारतीय कामगार सेनेने पुढाकार घेत इंडो थाई कंपनीत या कामगारांना सामावून घेतले. याच पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेनेतील सदस्यांनी आणि कामगारांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे काय बोलले?
उद्धव ठाकरे कामगारांशी बोलताना म्हणाले की, "तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की, मी काहीतरी पराक्रम केला आहे. पण, पराक्रम मी नाही केला. पराक्रम तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने केलेला आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाने केलेला आहे."
"शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल, तर त्याला तोडून मोडून टाकणं, यासाठी झाली. आकाशात घारी असतात, तशी गिधाडंही असतात. मला चिंता नेहमी आपल्यासोबत असलेल्या कामगारांचे या गिधाडांसापासून रक्षण करण्याची असते. कारण एकदा का एकजूट तुटली की तर लचके तोडायला आपले शत्रू मोकळे असतात", असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
"ज्यावेळी मी ही बातमी वाचली, त्यावेळी मी अरविंदजींना फोन केला. त्यांना सांगितलं कामगारांमध्ये जा. शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावर, शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे आणि हा विश्वासघात आमच्याकडून कधी होणं शक्य नाही", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"या सगळ्या कंपन्या येतात-जातात. कंपनी आणणारे आपण कोण? सेलेबी... बंदी घातल्यानंतर कळलं की, ती तुर्कस्तानची होती. नवीन कंपनीशी करार कोण करतं? तुम्ही आक्षेप घेतला, कंपनीचं काम बंद केलं. आपल्या देशाविरोधात जो कोणी असेल, त्याच्याकडून आम्हाला काही नकोय. तुमचेच बगलबच्चे या कंपन्यांबरोबर करार करतात", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केली.
त्यांचे राजकारणात तुकडे करायचं ठरवू -उद्धव ठाकरे
"संपूर्ण राजकारण्यांची जी खेळी आहे, मला भीती हीच वाटत होती की, एक निमित्त करून कंपनीला तोडायचं, कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तिथे लावायची. तुम्हाला रस्त्यावर ठेवून, दुसरी लोक तिथे भरायचे. यावेळी सामना करून त्यांना उत्तर दिलेलं आहे. उद्या जर तुम्हाला कुणकुण लागली तर आम्हाला कळवा. कुणाच्या मनामध्ये जर आपले लचके तोडण्याचा वाईट विचार येत असेल, तर त्याचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण सगळे एकत्र मिळून ठरवू", असे उद्धव ठाकरे म्हणाले.