Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर चालक आणि वाहकाची सामूहिक हत्या घडली असती; उपनिरीक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:28 IST

कुर्ला पोलिस ठाण्यातील दहशतवादविरोधी पथकात (एटीसी) उपनिरीक्षक चव्हाण कार्यरत आहेत. अपघात घडला, तेव्हा ते भाजी मार्केट परिसरात गस्त घालत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बेस्टमधील प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर संतप्त जमावाने वाहक सिद्धार्थ मोरेला चालक समजून मारहाण सुरू केली. त्यापाठोपाठ संजय मोरेलाही मारहाण केली. मात्र, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी जखमी अवस्थेतही दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आरोपी बेस्ट चालक संजय मोरे आणि वाहक सिद्धार्थ मोरे यांना जमावाच्या तावडीतून सुटका करत त्यांचे प्राण वाचवले. अन्यथा रस्त्यावर छिन्न-विछिन्न पडलेले मृतदेह पाहून रस्त्यावर उतरलेल्या दोन ते तीन हजारांच्या संतप्त जमावाच्या हातून या दोघांची सामूहिक हत्या घडली असती, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

कुर्ला पोलिस ठाण्यातील दहशतवादविरोधी पथकात (एटीसी) उपनिरीक्षक चव्हाण कार्यरत आहेत. अपघात घडला, तेव्हा ते भाजी मार्केट परिसरात गस्त घालत होते. भरधाव बेस्ट बसने फरफटत आणलेली एक रिक्षा चव्हाण यांच्या दिशेने आली. रिक्षा आणि पुढे उभ्या फळ विक्रेत्याच्या हातगाडीमध्ये चव्हाण अडकले. मागे पुढे पाहता अनियंत्रित बेस्ट बस अनेक वाहनांना धडकून, पादचाऱ्यांना चिरडून पुढे निघून गेल्याचा अंदाज बांधून चव्हाण यांनी कुर्ला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तोरडमल यांना घटनाक्रम सांगितला. 

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला. तोपर्यंत सुरुवातीला आंबेडकर नगरच्या कमानीला धडकून थांबलेल्या बसमधून संतप्त नागरिकांनी गणवेश सारखाच असल्याने सिद्धार्थ मोरेला चालक समजून मारहाण सुरू केली होती.  त्यानंतर संजय मोरेही त्यांच्या तावडीत सापडला. मारहाण सुरू असताना चव्हाण आणि सहकारी पोलिस अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेत गर्दीतून बाहेर काढून पोलिस ठाण्यात आणले.

टॅग्स :कुर्लाअपघातबेस्ट