...तर राष्ट्रपती राजवट लागेल; सुधीर मुनगंटीवार यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:58 AM2019-11-02T01:58:41+5:302019-11-02T01:59:12+5:30

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे काही करणे शक्य आहे ते करायला आम्ही तयार आहोत.

... then the President will have the reign; Statement by Sudhir Mungantiwar | ...तर राष्ट्रपती राजवट लागेल; सुधीर मुनगंटीवार यांचे विधान

...तर राष्ट्रपती राजवट लागेल; सुधीर मुनगंटीवार यांचे विधान

Next

मुंबई : नवीन विधानसभा ९ तारखेच्या आत अस्तित्वात आली पाहिजे, ती जर आली नाही तर राज्यात राष्टÑपती राजवट लागू होईल, असे विधान वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

भाजप शिवसेना युतीला राज्यातील जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी मतदान केले आहे, त्यामुळे सरकार युतीचेच होईल असे सांगत मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेसमोर जसे पर्याय आहेत तसेच ते आमच्यापुढेही आहेत. पण आपल्याला पूर्ण विश्वास आहे की युतीचेच सरकार होईल. जर त्या तारखेच्या आत सरकार झाले नाही तर राष्टÑपती राजवट लागू होईल असेही ते म्हणाले. यावर विधानसभेचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांना विचारले असता ते म्हणाले, आधी सर्वात जास्त सदस्य असणाऱ्या पक्षाला राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील.

त्यांना अमूक दिवसात विश्वास दर्शक ठराव मंजूर करा, असे सांगतील. त्या मुदतीत जर तसे झाले नाही तर दुसºया सर्वाधिक जास्त सदस्य असणाºया पक्षाला आमंत्रित केले जाईल, त्यांनाही सरकार स्थापन करण्यात अपयश आले तर शेवटचा पर्याय म्हणून राष्टÑपती राजवट असेल. तो काही पहिलाच पर्याय असू शकत नाही असेही कळसे म्हणाले.

‘मुनगंटीवार यांची कीव येते’
राष्ट्रपती राजवटीबाबत मुनगंटीवार यांच्या विधानाची मला कीव करावीशी वाटते, अशा शब्दात राष्टÑवादीचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. महायुती म्हणून अनेक पक्षांनी एकत्र येऊन राज्यातील निवडणूक लढवली. महायुतीला स्पष्ट बहुमत असताना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाहीत. यांना बहुमत दिले तरी ते राष्ट्रपती राजवटीची भाषा करत आहेत, हा राज्यातील जनतेचा अपमान असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. मुनगुंटीवार यांनी राज्यातील जनतेची आधी माफी मागावी आणि मग राष्ट्रपती राजवटीची भाषा करावी.

जागावाटप, बंडखोरीपाठोपाठ सत्ता स्थापनेतही शिवसेनेनेच का ऐकावे?
विधानसभा निवडणुकीसाठी युती करताना जागा वाटपाचा प्रश्न असो की निवडणुकीदरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरी आणि आता सत्ता स्थापनेतही भाजपचा आग्रह योग्य नाही. प्रत्येक वेळी शिवसेनेनेच भाजपचे का ऐकावे, असा प्रश्न सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून विजयी झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. जळगावमध्ये चार विधानसभा मतदार संघात भाजपच्याच पदाधिकाºयांनी केलेल्या बंडखोरीच्या मुद्यावर त्यांनी परखड मत व्यक्त करीत प्रत्येक बाबतीत भाजपच्या भूमिकेविषयी व इतर मुद्यांवर आक्रमकपणे भाष्य केले.

शिवसेना अडली तरच मुख्यमंत्रिपद’
शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून राहावे, अडून राहिल्यास शिवसेनेला नक्की मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर शिवसेना झुकणार की शहांना शरणगती घेण्यास भाग पाडणार. हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिवसेना भाजपची साथ सोडणार नसल्याचे देखील प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

भाजपने केली शिवसेनेची फसवणूक!
निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दहा दिवस झाले. मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजपने शिवसेनेची अडवणूक केली आहे, ही तर शुद्ध फसवणूक आहे या शब्दात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकसभेला त्यांना शिवसेनेची गरज होती, त्यावेळी त्यांना शिवसेनेला सगळे काही समान वाटप केले जाईल, असे सांगितले होते आणि आता दिलेला शब्द पाळायची वेळ आली तर आम्ही असे बोललोच नव्हतो, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. एका जबाबदार राजकीय पक्षाने आपल्या सहयोगी पक्षाची अशी फसवणूक करणे योग्य नाही, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

आम्हाला एकत्र यायला काय हरकत?
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे काही करणे शक्य आहे ते करायला आम्ही तयार आहोत. दुसºया महायुद्धात हिटलर यांचा पराभव करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष स्टॅलिन, अमेरिकेचे अध्यक्ष रुझव्हेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल हे परस्पर विरोधी नेते जर एकत्र येऊ शकले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र का येऊ शकणार नाहीत, असे ठाम मत राष्टÑवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या म्हणण्याला बळ मिळत असल्याचे बोलले जाते.

Web Title: ... then the President will have the reign; Statement by Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.