दागिन्यांच्या जाहिरातीचं शुटींगवेळी मॉडेलच्या गळ्यातील हिऱ्याच्या दागिन्याची चोरी, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:53 IST2025-09-04T10:52:19+5:302025-09-04T10:53:17+5:30
खासगी ज्वेलरी कंपनीच्या ऑनलाइन मार्केटिंगची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रद्धा दोडमानी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

दागिन्यांच्या जाहिरातीचं शुटींगवेळी मॉडेलच्या गळ्यातील हिऱ्याच्या दागिन्याची चोरी, नेमकं काय घडलं?
दागिन्यांच्या जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी मॉडेलच्या गळ्यातील ११ लाख रुपयांचा हिऱ्याचा दागिना चोरीला गेल्याची घटना अंधेरीतील ब्लॅक फ्रेम स्टुडिओमध्ये २८ ऑगस्टला घडली आहे. या प्रकरणी अंबोनी पोलिसांनी अनोखळी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खासगी ज्वेलरी कंपनीच्या ऑनलाइन मार्केटिंगची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रद्धा दोडमानी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. कंपनीची जाहिरात आणि प्रसार करण्यासाठी २८ ऑगस्टला त्यांनी ब्लॅक फ्रेम स्टुडिओत फोटोशूट आणि व्हिडिओग्राफीचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी ६० दागिने नेले, तर या दरम्यान आणखी १९ दागिने मागवून एकूण ७९ नग वापरले.
त्यानंतर एक दागिना तक्रारदाराने सोबत ठेवत उर्वरित सर्व दागिने व्यवस्थित पॅक करुन परत पाठवले. मात्र, २९ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता. कंपनीचे डायमंड हेड जिगरभान शेख यांनी ७७ दागिने परत मिळाले असून मॉडेल रिया हिच्या गळ्यात वापरलेला दागिने गायब आहे, असे श्रद्धा यांना कळविले. त्या दागिन्याची किंमत ११ लाख १२ हजार ९१६ रुपये आहे. त्यानंतर तक्रारदाराने स्टुडिओमध्ये तपास केला. मात्र, दागिना कुठेही सापडला नाही. त्यामुळे अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधितांची चौकशी सुरू आहे.