लाकडी चौथऱ्याचा आधार सुटला अन् आयुष्याची तुटली दोरी, तेराव्या मजल्यावरून पडून तेलंगणातील कामगाराचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:27 IST2025-10-13T11:27:32+5:302025-10-13T11:27:32+5:30
कवाली यधप्पा बलप्पा (४६) असे मृत कामगाराचे नाव असून, ते मूळचे तेलंगणातील कोटाकोंडा येथील आहेत.

लाकडी चौथऱ्याचा आधार सुटला अन् आयुष्याची तुटली दोरी, तेराव्या मजल्यावरून पडून तेलंगणातील कामगाराचा अंत
मुंबई : चेंबूर येथील सुभाषनगरमधील दीपज्योती इमारतीच्या बांधकामस्थळी काम करत असताना तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या लाकडी चौथऱ्याचा आधार तुटल्याने मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कवाली यधप्पा बलप्पा (४६) असे मृत कामगाराचे नाव असून, ते मूळचे तेलंगणातील कोटाकोंडा येथील आहेत.
ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. यधप्पा हे तेराव्या मजल्यावरील लिफ्ट गाळ्यामध्ये प्लास्टरचे काम करत असताना त्याच्या पायाखालचा बांबूचा आधार अचानक तुटल्याने ते थेट तळमजल्यावर कोसळले. इतक्या उंचावरून कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.
यधप्पा यांच्यासोबत काम करणाऱ्या अन्य कामगारांच्या माहितीनुसार, संपूर्ण लिफ्टमध्ये कुठेही सुरक्षा जाळी बसविलेली नव्हती, तसेच यधप्पा यांना कोणताही सुरक्षा बेल्ट पुरविण्यात आलेला नव्हता. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कंत्राटदार, साइट सुपरवायझरवर निष्काळजीपणाचा आरोप
बलप्पा यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बांधकाम साइटवरील कॉन्ट्रॅक्टर अशोक रंगानी आणि साइट सुपरवायझर दिलीपकुमार जयस्वाल यांच्यावर निष्काळजीपणा आणि हयगयीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार, चेंबूर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.