सोन्याची गुंतवणूक करणार श्रीमंत; दिले उत्तम रिटर्न, पुढच्या दिवाळीपर्यंत ७० हजारांवर जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:19 AM2023-11-16T10:19:34+5:302023-11-16T10:20:11+5:30

वर्षभरामध्ये सोने ७० हजारांचा आकडा पार करण्याचा अंदाज आहे.

The rich will invest in gold; Good returns given, likely to go up to 70 thousand by next Diwali | सोन्याची गुंतवणूक करणार श्रीमंत; दिले उत्तम रिटर्न, पुढच्या दिवाळीपर्यंत ७० हजारांवर जाण्याची शक्यता

सोन्याची गुंतवणूक करणार श्रीमंत; दिले उत्तम रिटर्न, पुढच्या दिवाळीपर्यंत ७० हजारांवर जाण्याची शक्यता

मुंबई : गुंतवणुकीचा सर्वांत सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे बघितले जाते. काही जण याकडे डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असले, तरी भारतीयांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा कल दिसून येतो. जगभरातील विविध क्षेत्रामधील कल लक्षात घेता या वर्षभरामध्ये सोन्याचे दर तेजीमध्येच राहण्याची शक्यता आहे. 

वर्षभरामध्ये सोने ७० हजारांचा आकडा पार करण्याचा अंदाज आहे. भारतीय नागरिकांच्या घरांमध्ये सुमारे २१ हजार टन सोने असल्याचा अंदाज आहे. सोन्यातील गुंतवणुकीने वर्षभरात चांगला परतावा दिला आहे. मध्य पूर्वेमध्ये निर्माण झालेल्या भू-राजकीय अस्थिरतेनंतर सोन्याच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे खाली आलेल्या सोन्याच्या दराला चांगलाच उठाव आला. त्यामुळे सोन्याचा भाव पुन्हा चढू लागला आहे. सोन्याच्या दरावर डॉलर इंडेक्स, व्याजदर आणि खनिज तेलाचे दर यांचा मोठा परिणाम होत असतो. हे सर्व घटक आगामी काळातील सोन्याच्या भाववाढीला मदत करणारे आहेत.

सोन्याने दिला २० टक्के परतावा

तीन वर्षांमध्ये धनत्रयोदशीला असलेल्या सोन्याचा दराचा अभ्यास करून वर्षभरात त्यापासून किती परतावा मिळाला, याचे गणित मांडल्यास या वर्षामध्ये सोन्याने २० टक्के परतावा दिला. सन २०२०-२१ मध्ये सोन्याच्या दरामध्ये घट झाल्यामुळे वर्षभरात ५ टक्के नुकसान झाले. सन २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये अनुक्रमे १० आणि २० टक्क्यांनी वाढ झाली. याचाच अर्थ सोन्याच्या आकर्षणामध्ये वाढ झाली. 

बँकांनी खरेदी केले ८०० टन सोने 
सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. देशोदेशीच्या मध्यवर्ती बँका सोन्याचे दर कमी झाले की, सोन्याची खरेदी करून चलनाला मजबुती आणत असतात. गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकांनी सुमारे १,००० टन सोने खरेदी केले. यंदा पहिल्या नऊ महिन्यांत बँकांनी ८०० टन सोने खरेदी केले आहे. मागील वर्षापेक्षा खरेदीमध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली. 

दर किती वाढू शकतात? 
गेली साडेतीन वर्षे सोन्याचा दर २०७५ डॉलर/प्रति औंसच्या आसपास आहेत. तीन वेळा सोन्याच्या दराने उच्चांकही स्थापित केला. सोन्याच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात निर्बंध आले, तर दरामध्ये वाढ होऊन ते २२५० ते २४०० डॉलर प्रति औंस होऊ शकतात. याचाच अर्थ भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर ६८ ते ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

हे घटक ठरवणार किती झळाळेल सोने? 
पुढील वर्षी अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात काही प्रमाणात कपात करून अर्थव्यवस्थेमध्ये अधिक प्रमाणात पैसा आणू शकतात. परिणामी, सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ होऊन दरवाढ होऊ शकते. मध्य पूर्वेतील युद्ध लवकर थांबविण्याचे प्रयत्न झाल्यास खनिज तेलाचे वाढणारे दर  कमी होऊन सोनेखरेदी अधिक होऊ शकते. 

 

Web Title: The rich will invest in gold; Good returns given, likely to go up to 70 thousand by next Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.