जवळपास दशक पूर्ण, कुर्ला उन्नत मार्ग रखडला त्याची खरी कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:29 IST2025-12-01T12:25:35+5:302025-12-01T12:29:13+5:30
हा प्रकल्प २०१५-१६ मध्ये मंजूर झाला. परंतु जवळपास दशक पूर्ण होत आले तरी प्रकल्पाचा वेग समाधानकारक नाही. मुंबई रेल प्रवासी संघाने केलेल्या विश्लेषणात काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत.

जवळपास दशक पूर्ण, कुर्ला उन्नत मार्ग रखडला त्याची खरी कारणे...
- सिद्धेश देसाई उपाध्यक्ष, मुंबई रेल प्रवासी संघ
मुबई उपनगरीय रेल्वे ही देशातील सर्वाधिक वहनक्षमता असलेली आणि सर्वाधिक जिवंत प्रणाली आहे. दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचवणारी ही सेवा किती महत्त्वाची आहे, हे मुंबईकरांना रोजच्या अनुभवातून जाणवते. अशा वेळी कुर्ला येथील बहुप्रतीक्षित उन्नत मार्ग /उन्नत पूल प्रकल्पातील सातत्यपूर्ण विलंब हे थेट मुंबईकरांच्या सुरक्षेशी संबंधित संकट आहे.
मुंबई उपनगरीचे मध्यवर्ती आणि मुख्य केंद्र असलेल्या कुर्ला स्थानकावर सध्या देशातील सर्वात महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांपैकी एक-कुर्ला उन्नत हार्बर लाइन प्रकल्प बांधकामाधीन आहे. तो फक्त पूल किंवा स्टेशन उभे करण्यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण हार्बर लाइनची संरचना बदलून तिची भविष्यातील क्षमता वाढवणे, पावसाळी अडथळे कमी करणे आणि उपनगरी व लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतुकीतील संघर्ष पूर्णपणे दूर करणे, हे त्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हा प्रकल्प २०१५-१६ मध्ये मंजूर झाला. परंतु जवळपास दशक पूर्ण होत आले तरी प्रकल्पाचा वेग समाधानकारक नाही. मुंबई रेल प्रवासी संघाने केलेल्या विश्लेषणात काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपुरी पूर्वतयारी. भूमी उपलब्धता, युटिलिटी लाइन शिफ्टिंग, वाहतुकीचे पर्यायी नियोजन या सर्व बाबतीत सुरुवातीपासूनच स्पष्टता नव्हती. दुसरा मुद्दा म्हणजे कामाच्या गुंतागुंतीचा कमी अंदाज. सर्क्युलेटिंग एरिया, विद्यमान पूल, तांत्रिक कनेक्टिव्हिटी या सर्वामध्ये प्रकल्पाला प्रत्यक्षात ज्या आव्हानांचा सामना करावा लागला, त्यांचा समावेश मूळ आराखड्यात पुरेसा नव्हता.
तिसरा आणि सर्वाधिक त्रासदायक मुद्दा म्हणजे विभागांमधील समन्वयाचा अभाव. रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, स्थानिक विभाग, वाहतूक पोलिस, कंत्राटदार या सर्वांची भूमिका यात आहे; पण यांच्यातील समन्वयाचा अभाव हा प्रकल्प वारंवार थांबण्याचे अत्यंत गंभीर कारण ठरला आहे.. अगदी साध्या टप्प्यांसाठीही परस्पर परवानग्या आणि मंजुरींची कसरत करताना वेळ गेला. त्यात बदलत्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदलीमुळे निर्णयक्षमता आणखी कमकुवत झाली.
मुंबई रेल प्रवासी संघाची मागणी
प्रकल्पाचा पारदर्शक प्रगती अहवाल जाहीर करावा.
कंत्राटदारांच्या दिरंगाईवर कठोर कारवाई करावी.
तृतीय-पक्ष तांत्रिक ऑडिट त्वरित नियुक्त करावे.
हार्बर लाइनवरील अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ सुरक्षा सुधारणा कराव्यात.
उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे.
रेल्वे प्रकल्पांसाठी अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्रैमसिक बैठक व्हावी.