गणेशोत्सवाची धामधूम, सिनेमांची ‘अग्निपरीक्षा’; एकही मराठी सिनेमा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:08 IST2023-09-27T13:07:19+5:302023-09-27T13:08:07+5:30
हिंदीची अवस्था बिकट; एकही मराठी सिनेमा नाही

गणेशोत्सवाची धामधूम, सिनेमांची ‘अग्निपरीक्षा’; एकही मराठी सिनेमा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवाचा काळ आणि त्या पूर्वीचा आठवडा सिनेसृष्टीसाठी जणू ‘अग्निपरीक्षे’चा ठरतो. यंदाही हेच चित्र पाहायला मिळाले. गणेशोत्सवाच्या काळात दोन हिंदी सिनेमे रिलीज झाले; पण दोन्ही चित्रपटांना बॅाक्स ऑफिसवर यश मिळू शकले नाही. मराठी सिनेसृष्टीत दोन आठवड्यांमध्ये एकही सिनेमा रिलीज झालेला नाही.
मागच्या शुक्रवारी रिलीज झालेल्या विकी कौशल आणि मानुषी छिल्लर अभिनीत ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.२५ कोटी रुपयांची कमाई करत निराशा केली. ४० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १.४ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी १.५ कोटी रुपये कमावल्याने या चित्रपटाच्या खात्यावर पहिल्या वीकेंडला केवळ ४.१५ कोटी रुपये जमा झाले. शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ चित्रपट नावापुरताच सुखी ठरला. गणेशोत्सवाच्या धामधुमीत रसिकांनी पाठ फिरवल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाला तीन दिवसांमध्ये सव्वाकोटी रुपयांपर्यंतही मजल मारता आली नाही.
मराठीतही यापेक्षा फार वेगळे चित्र नाही. गणेशोत्सवापूर्वीच्या आणि मागच्या शुक्रवारी एकही मराठी चित्रपट रिलीज झाला नाही. मागच्या शुक्रवारी ‘खळगं’ हा चित्रपट रिलीज होणार होता; पण तोदेखील पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी ‘फुक्रे ३’ या हिंदी चित्रपटासोबत ‘तीन अडकून सीताराम’ व ‘सासूबाई जोरात’ हे मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये खऱ्या अर्थाने चित्रपटांचा धमाका होणार आहे. तेव्हा प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे.
गणेशोत्सवासह इतर सणासुदीचा फटका नेहमीच मनोरंजन विश्वाला बसतो. गणपतीपूर्वी लोक गणेशाच्या आगमनाच्या तयारीत बिझी असतात आणि नंतर गणेशभक्तीत रममाण होतात. त्यामुळे सिनेमागृहांकडे फार कोणी फिरकत नाही. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. रिलीज झालेल्या दोन्ही हिंदी सिनेमांना याचा फटका बसला आहे. मराठी चित्रपट रिलीजच झाले नाहीत.
- नितीन दातार (अध्यक्ष, थिएटर ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया)