Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय'; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 20:56 IST

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. राष्टवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रीया दिली. 

'हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवा', जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान

जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. 'निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय  शरद पवार साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

शरद पवारांना मोठा धक्का

भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध झुगारून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४१ आमदार अजित पवारांसोबत गेले तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर तब्बल १० वेळा झालेल्या सुनावणीनंतर आज निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं सांगत पक्षाचं चिन्हही त्यांना दिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी शरद पवार गटाला आता पक्षाचं नवीन नाव आणि नवीन चिन्हाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे.

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस