दादर स्टेशनवर महिलेचे केस कापून पळणारा माथेफिरू अखेर सापडला, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:31 IST2025-01-09T12:31:28+5:302025-01-09T12:31:58+5:30
Mumbai Crime News: मुंबईतील प्रमुख रेल्वे स्टेशन असलेल्या दादरमध्ये एका माथेफिरूने महिलेचे केस कापून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

दादर स्टेशनवर महिलेचे केस कापून पळणारा माथेफिरू अखेर सापडला, समोर आलं धक्कादायक कारण
सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असतानाच मुंबईतील प्रमुख रेल्वे स्टेशन असलेल्या दादरमध्ये एका माथेफिरूने महिलेचे केस कापून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महिलेचे केस कापून पळणाऱ्या आरोपीचं नाव दिनेश गायकवाड असं आहे. तो एका खाजगी कंपनीत काम करतो. ही घटना घडल्यानंतर एका दिवसाने पोलिसांनी आरोपीला मुंबई सेंट्रल पोलीस स्टेशन येथून पकडले.
आरोपीच्या चौकशीमधून त्याने केलेल्या या कृत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लांब केस आवडत नसल्याने मी महिलेचे केस कापले, अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे. पीडित महिला दादर रेल्वे स्टेशनवरील पश्चिम रेल्वेच्या मार्गाकडे जात असताना ही घटना घडली होती. महिलेने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीचा फायदा घेऊन आरोपी फरार झाला होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवारी एका अज्ञात व्यक्तीने महिलेचे केस कापल्याची ही घटना दादर रेल्वे स्टेशनवर घडली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. दरम्यान, महिलांचे केस कापण्याच्या घटना याआधी इतरही काही राज्यांमध्ये घडल्या होत्या.