उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:51 IST2026-01-15T17:51:40+5:302026-01-15T17:51:59+5:30
टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरण (Segregation) मतमोजणीच्या दिवशीच करण्यात येणार आहे

उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
मुंबई - टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतदानाच्या दिवशीच स्ट्राँग रुममधून बाहेर काढण्याच्या निर्णयावरून बराच गदारोळ माजला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकावर उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आता मुंबई महापालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे पत्रक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. टपाली मतपत्रिकांबाबत ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते असा खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले की, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. हे पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या अभिरक्षा कक्षातून (स्ट्राँग रुम) बाहेर काढण्यात येणार नाहीत असं त्यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, टपाली मतपत्रिकेच्या पेट्या मतदान यंत्रासह (EVM) मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी स्ट्राँग रुम कक्षातून बाहेर काढण्यात येतील. त्या अनुषंगाने उमेदवार किंवा उमेदवाराने अधिकृतरीत्या नेमलेले प्रतिनिधी यांनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावे असे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरण (Segregation) देखील त्याचवेळेला करण्यात येणार आहे असं मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंनी घेतला होता आक्षेप
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या या पत्रावर आक्षेप घेतला होता. फारपूर्वी मतदान झाल्यानंतर तात्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत. मग त्यात पोस्टल मतेही आली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ८ जानेवारीला एक पत्र काढले. त्यात प्रभाग क्रमांत २०० ते २०६ याठिकाणी मतदानाच्या दिवशी दुपारी ३ वाजता टपाली मतपत्रिकांच्या मतपेट्या बाहेर काढण्यात येणार आहे असं कळवले. हा कोणता प्रकार आहे? ही कसली लोकशाही आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.