Join us

"माझ्या ट्विटचा प्रभाव अन्..."; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, मुंबईकरांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 20:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करण्यात येणार होतं

मुंबई - गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली नवी मुंबईचीमेट्रो आता प्रवाशांच्या सेवेत सुरू होत आहे. कोणत्याही प्रकारचं उद्घाटन न करता बेलापूर ते पेंधर मार्गावर नवी मुंबईची पहिली मेट्रो धावणार उद्या म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांसदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे समजते. त्यानंतर, शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री शिंदेंवर आणि महायुती सरकारवर निशाणा साधला. तसेच, मी काल आणि तत्पूर्वी केलेल्या ट्विटचाच हा परिणाम असल्याचंही ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करण्यात येणार होतं. पण, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर विना उद्घाटन ही मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, अनेक वर्षांपासूनचं नवी मुंबईकरांचं मेट्रोचं स्वप्न आता साकार होत आहे. उद्घाटन प्रक्रियेच्या राजकीय श्रेयवादात अडकलेली मेट्रोची लाल फित उद्या कापली जाईल. त्यावरुन, आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.  

माझ्या कालच्या आणि पूर्वीच्या ट्विटचा आणखी एक प्रभाव दिसून येत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. नवी मुंबई मेट्रो सुरू करण्यासंदर्भात आदित्य यांनी ट्विट करुन सरकारकडे मागणी केली होती. आता, पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आदित्य यांनी निशाणा साधला आहे. नवी मुंबई मेट्रो उद्घाटनासाठी ५ महिन्यांपासून तयार आहे, पण खोके सरकारच्या राजकारण्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही, असे मी ट्विट करून प्रसारमाध्यमांमध्ये नमूद केले होते. आज बेकायदा मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून मेट्रो सुरू करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचे दिसत आहे. 

या बेकायदेशीर सरकारच्या मंत्र्यांना लोकांसाठी वेळ नसेल, पण ते लोकांसाठी तरी खुले करा, अशी मागणी मी केली होती, असे आदित्य यांनी म्हटले. तसेच, सध्याच्या मिंधे-भाजपच्या राजवटीसाठी, ज्यांनी महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सरकारी पदांवर कब्जा केला आहे, ते स्वतः प्रथम, पक्ष नंतर आणि जनता शेवटची असंच मानत असल्याचा टोलाही आदित्य यांनी लगावला. 

दरम्यान, दुसऱ्या राज्यात त्यांच्या पक्षाचा प्रचार करायला त्यांच्याकडे वेळ आहे, पण नवी मुंबई मेट्रो ५ महिन्यांपासून सुरू करायला वेळ नाही. आणि , त्याचप्रमाणे डेलिसल रोड ब्रिजसुद्धा, असेही आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.   

टॅग्स :नवी मुंबईएकनाथ शिंदेमेट्रोट्विटरआदित्य ठाकरे