भाजप-शिंदेसेना युतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम; फडणवीस-शिंदेंची बैठक, दोघांमध्ये पुन्हा एकदा चर्चेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 06:56 IST2025-12-24T06:55:29+5:302025-12-24T06:56:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असताना आणि उद्धव व राज ठाकरे ...

भाजप-शिंदेसेना युतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम; फडणवीस-शिंदेंची बैठक, दोघांमध्ये पुन्हा एकदा चर्चेची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असताना आणि उद्धव व राज ठाकरे हे दोन बंधू बुधवारी युतीची घोषणा करणार असताना भाजप आणि शिंदेसेनेत मात्र जागावाटपाचा अंतिम फैसला अद्याप होऊ शकलेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी रात्री ११ ला बैठक सुरू होऊन अडीच वाजता संपली. मुंबईत महापालिकेच्या २२७ जागा आहेत भाजपकडून मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत व माजी खा. राहुल शेवाळे यांच्यात काही बैठका झाल्या आणि त्यात १५० जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत आणखी ३० जागांवर म्हणजे एकूण १८० जागांवर एकमत झाले मात्र, आणखी ४७ जागांवरील पेच कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
युती होणारच : खा. म्हस्के
आमच्या दोन पक्षांमध्ये (भाजप-शिंदेसेना) युती ही होणारच आहे, त्यासाठीची घोषणा आधी होईल आणि मग जागावाटपाचे सूत्र जाहीर केले जाईल, असे शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी ठाणे येथे पत्रकारांना सांगितले. जागावाटपाचा तिढा कुठेही नाही, असे ते म्हणाले.
भाजप ७० ते ७५ जागा देण्यास राजी
शिंदेसेनेला ११० जागा मुंबईत हव्या आहेत आणि त्याचवेळी ठाण्यात ते भाजपला ३५ पेक्षा अधिक जागा द्यायला तयार नाहीत. नवी मुंबईत भाजपकडून शिंदेसेनेला फारच कमी जागांची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे घोडे अडले आहे.
शिंदेसेनेला ७० ते ७५ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाला सात ते आठ जागा भाजप दे्ईल पण त्यांचे उमेदवार कमळावर लढतील, अशी दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादीला (अजित पवार) महायुतीत सोबत घेण्याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चेची पहिली फेरी झाली आहे, उद्या आम्ही पुन्हा चर्चा करू, असे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.