Join us  

महायुतीच्या जागांचा फैसला अंतिम टप्प्यात; नाशिक कोणाच्या वाट्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 6:24 AM

ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी भाजपकडे, तर कल्याण, पालघर, औरंगाबाद, नाशिक शिंदेसेनेला

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महायुतीच्या वादात सापडलेल्या जागांचा फैसला अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग - रत्नागिरी या जागा भाजपकडे जातील. शिंदेसेनेला नाशिक, कल्याण, पालघर आणि औरंगाबाद या चार जागा दिल्या जातील. आतापर्यंत बारामती, शिरूर, उस्मानाबाद आणि रायगड अशा चार जागा मिळालेल्या आणि आपल्या कोट्यातील एक जागा महादेव जानकर यांना देणाऱ्या अजित पवार गटाने नाशिकच्या जागेचा आग्रह धरला आहे, पण या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही असून तो मान्य केला जाण्याची शक्यता आहे. नाशिकच्या जागेची मागणी भाजपनेही सोडलेली नाही. जागांच्या अदलाबदलीत नाशिक वाट्याला आले तर घेण्याची तयारी भाजप नेत्यांनी ठेवली आहे. 

मुंबईत शिंदेसेनेला आतापर्यंत एकच (दक्षिण मध्य -राहुल शेवाळे) जागा मिळाली आहे. गजानन कीर्तिकर सध्या खासदार आहेत त्या मुंबई उत्तर-पश्चिमची किंवा मुंबई दक्षिणची जागा द्या अशी शिंदेसेनेची मागणी आहे. या दोनपैकी एक जागा शिंदेसेनेला देऊन उरलेली एक जागा आणि मुंबई उत्तर-मध्य अशा दोन जागा भाजपकडे जातील. मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला असल्याने त्यांना जागा देण्याचा विषय आता संपला आहे. 

तिढा सुटल्याचा दावा  महाविकास आघाडीत चार जागा उद्धवसेना लढत आहे, तर दोन जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. हेच सूत्र भाजपने स्वीकारावे आणि आम्हाला दोन जागा द्याव्यात असा शिंदेसेनेचा आग्रह असल्याचे समजते. मुंबई उत्तर आणि उत्तर-पूर्वचे उमेदवार भाजपने आधीच जाहीर केले आहेत. महायुतीतील जागांचा तिढा सुटलेला आहे, असा दावा शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

लोढा-राज ठाकरे भेटnमुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. nत्यामुळे लोढा मुंबई दक्षिणतून लढणार अशा चर्चेला जोर आला. मात्र, लोढा यांनी स्पष्ट केले, की गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात असतात. ही भेट वैयक्तिक होती.

टॅग्स :महायुतीमुंबईलोकसभा निवडणूक २०२४शिवसेनाभाजपानाशिक