लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिल्याची रोज एक बातमी मला पाहायला मिळते. मग मी माझ्या कार्यालयाला विचारणा करतो, तेव्हा अशी फाईल आली नसल्याचे समजते, असे सांगत आपण शिंदेंच्या काळातील कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले. आमच्यात ओढाताण असल्याचे आणि मी एकाधिकारशाही करत असल्याचे वातावरण पसरवले जात असल्याचेही फडणवीस म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. आमदाराने निवेदन दिल्यानंतर त्यावर तपासून कारवाई करावी किंवा माहिती घ्यावी, असे लिहिले जाते. असे पत्र गेले म्हणजे चौकशी सुरू झाली किंवा स्थगिती आली, असे नसते. कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल तर दुसरी बाजू आल्याशिवाय आपण करत नाही, असे फडणवीस म्हणाले.
‘ती’ फाईल माझ्याकडे आली नाही. आरोग्य विभागाच्या कामात नऊ टक्के पैसे भांडवली खर्च केले होते. केंद्राचे म्हणणे होते भांडवली खर्च ५ टक्का करा. तेव्हा संबंधित मंत्री व सचिवांनी कामांचा प्राधान्यक्रम मागवला. ही फाईल माझ्याकडे आली नाही व मी त्यावर स्थगितीही दिलेली नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले.
सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
महायुती सरकार शेतकरीविरोधी व तीन बाजूंनी तीन तोंडे असलेले विसंवादी सरकार आहे. जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावण्याऐवजी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला सापत्न वागणूक दिली आहे, त्यामुळे सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याची माहिती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारकडे बहुमत आणि विरोधकांकडे कमी संख्याबळ असले तरी सरकारला घाम फोडण्याची तयारी मविआने केली आहे.
तुम्ही कितीही ब्रेकिंग बातम्या दिल्या तरी आमच्यात ब्रेकअप होणार नाही, आमच्यात कोल्डवॉर नाही तर सगळे कुल कुल आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री