कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या वाढली; आतापर्यंत ६ मृत्यू तर ४९ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:23 IST2024-12-10T09:23:01+5:302024-12-10T09:23:23+5:30
रात्री झालेल्या अपघातामुळे पोलिसांनी कुर्ला स्टेशनजवळील वाहतूक बंद केली आहे. अनेक बसेस पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या वाढली; आतापर्यंत ६ मृत्यू तर ४९ जखमी
मुंबई - शहरातील कुर्ला भागात सोमवारी रात्री भीषण बेस्ट बस अपघात झाला. भरघाव वेगाने आलेल्या बसने ३० हून अधिक लोकांचा चिरडले. आतापर्यंत या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ४९ जखमी झाले आहेत. कुर्ला पश्चिमेकडील आंबेडकर नगर भागात ही दुर्घटना घडली. ही बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने जात होती. सध्या या अपघातातील जखमींवर सायन, कुर्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे कुर्ला स्टेशन भागातील बस सेवा खंडीत करण्यात आली असून इथल्या सर्व बससेवा पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
रात्री झालेल्या अपघातामुळे पोलिसांनी कुर्ला स्टेशनजवळील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे बस क्रमांक ३७,३२०,३१९,३२५,३३०,३६५ आणि ४४६ बसेस कुर्ला आगारातून चालवल्या जातील. त्याशिवाय सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन चालणारे बस क्रमांक ३११,३१३ आणि ३१८ च्या बसेस टिळक नगर येथून यू टर्न घेऊन कुर्ला स्टेशनला न जाता सांताक्रुझ स्टेशन जातील. बस क्रमांक ३१० ही टिळक नगर पुल येथे यू टर्न घेून वांद्रे बस स्थानकला जाईल.
Mumbai, Maharashtra | The death toll in the Kurla bus accident rises to 6 and the no. of injured people increases to 49: Fire Department https://t.co/yLw6r86xNY
— ANI (@ANI) December 10, 2024
"चालक घाबरला अन् त्याने..."
बेस्टच्या ३३२ क्रमांकाच्या बस चालकाने बसवरील नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक वाहने आणि लोकांना चिरडले. एका सोसायटीची भिंत तोडून नियंत्रणाबाहेर गेलेली बस शेवटी थांबली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ४९ जण जखमी झालेत. नियंत्रणाबाहेर गेलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे म्हटलं आहे.
या भीषण घटनेनंतर आमदार दिलीप लांडे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती घेतली. कुर्ला स्टेशनवरून निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाला आणि चालकाचा बसवरील ताबा सुटला. चालक घाबरला आणि त्याने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबला ज्यामुळे गाडीचा वेग आणखी वाढला. त्यामुळे बस अनियंत्रित झाली. त्यामुळे बसने रस्त्यावरील लोकांना धडक दिली अशी माहिती दिलीप लांडे यांनी दिली.
दरम्यान, बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असं संजय मोरेने दावा केला आहे मात्र, बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने बसवर नियंत्रण ठेवू शकला नाही असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. प्रथमदर्शनी बसचे ब्रेक ठीक आहेत. याबाबत सविस्तर चौकशी करण्यात येईल असं राज्य परिवहन विभागाचे निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले.