ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:44 IST2026-01-10T19:42:38+5:302026-01-10T19:44:28+5:30
Mumbai Municipal electons 2026 Raj Thackeray Uddhav Thackeray: शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. सभेची तारीख जाहीर करण्यात आली असून, एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Sabha 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र आलेल्या ठाकरे बंधूची मुंबईतील पहिली सभा रविवारी (११ जानेवारी) होत आहे. या सभेचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्क मैदानावर ही सभा होणार आहे. मराठी, मुंबई आणि शिवशक्ती या तीन मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
'मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी, मुंबई लुटू पाहणाऱ्यांना तडीपार करण्यासाठी, मुंबई रक्षणाची शिवगर्जना करण्यासाठी, शिवशक्ती एकवटणार' असे म्हणत या सभेच्या टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरची सुरुवात बाळासाहेब ठाकरेंच्या जमलेल्या माझ्या हिंदू बंधूनो, भगिनींनो आणि मातानो, या संवादाने होते.
मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी,
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 10, 2026
मुंबई लुटू पाहणाऱ्यांना तडीपार करण्यासाठी,
मुंबई रक्षणाची शिवगर्जना करण्यासाठी,
शिवशक्ती एकवटणार!
ठाकरे येताहेत…
स्थळ – शिवतीर्थ
रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी
वेळ – सायंकाळी ६.०० वाजता pic.twitter.com/z5MSDq8dH1
राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या प्रत्येक मुलाखतीमध्ये राज ठाकरेंकडून मुंबईबद्दल शासनकर्त्यांचा डाव काय आहे, हे मी माझ्या सभेत मांडणार आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राज ठाकरे मुंबईतील या सभेत काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
राज ठाकरे यांच्याकडून केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारबद्दल गंभीर आरोप केले गेले आहेत. आता त्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि गुजरातला जोडण्याचा आरोप केला आहे. याबद्दलची व्यवस्थित मांडणी सभेतून करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दोन दशकांनंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू निवडणुकीच्या सभेत एकत्र दिसणार आहे. मुंबई महापालिकेची यावेळची निवडणूक प्रचंड अटीतटीची होताना दिसत आहे. भाजपाकडून ठाकरे बंधूंना लक्ष्य केले जात असताना दोन्ही बंधू सत्ताधाऱ्यांबद्दल काय बोलणार आणि मुंबईतील मतदारांसमोर कोणता अजेंडा मांडणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.