Join us

शिंदे-फडणवीसांनी मंत्रालयातील टपाल केंद्राचे केले उद्घाटन; नागरिकांच्या वेळेची होणार बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 15:01 IST

सर्व विभागाचे टपाल एकाच ठिकाणी स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे.

मुंबई: मंत्रालयात उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदने व टपाल घेऊन मंत्रालयात येत असतात, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारे टपाल प्राप्त होत असते. त्याचा जलद गतीने बटवारा होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते टपाल पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले आहे. 

या टपाल केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-खाते एनआयसी (NIC) मार्फत तयार करण्यात आले आहे. याद्वारे संबंधित विभागाकडे पाठविलेल्या टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार असून, त्या टपालाचा पुढील प्रवासही वेळोवेळी कळू शकणार आहे.  यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. 

सर्व विभागाचे टपाल एकाच ठिकाणी स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे. नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच कार्यवाही होणार आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल याठिकाणी समक्ष स्वीकारले जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकारमंत्रालय