तुळशीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 10:30 AM2024-03-07T10:30:56+5:302024-03-07T10:32:39+5:30

पालिकेकडून मुंबईकरांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या विविध पाणी प्रकल्पावर काम सुरू आहे.

the capacity of tulsi water treatment plant will increase process of appointment of consultant started | तुळशीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू 

तुळशीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू 

मुंबई : मुंबईच्या पाण्याच्या मागणीतही वाढ होत आहे. मात्र पाणीगळती, पाणीचोरी आणि वातावरणातील बदलामुळे पडणारा असमाधानकारक पाऊस यांमुळे पाण्याची समस्या मुंबईकरांना तीव्रतेने जाणवू लागली आहे. दरम्यान, पालिकेकडून मुंबईकरांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या विविध पाणी प्रकल्पावर काम सुरू आहे. याचाच भाग म्हणून सध्या कार्यरत असणाऱ्या तुळशी जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता भविष्यात वाढविता येईल का? वाढविता आली तर त्याचे सर्वेक्षण कसे करावे? याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून होत आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. 

१)  संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात असलेल्या तुळशी तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ही ८,०४६ दशलक्ष लिटर इतकी असून, हा भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे. 

२)  या तलावाच्या परिसरात ही सध्या १८ दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प अस्तित्वात आहे. मात्र भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्पाप्रमाणे या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आयुर्मान ही लवकरच संपणार आहे. 

अतिरिक्त पाणी आणायचे कुठून?

मुंबईत ज्या वेगाने पुनर्विकास सुरू आहे ती पाहता भविष्यात बांधकामे वाढणार आहेत. पर्यायाने लोकसंख्येसाठी अतिरिक्त पाणी आणायचे कुठून हा प्रश्न निर्माण होणार आहे. याचसाठी पालिकेकडून पाणी शुद्धीकरणाच्या आणि पाणी उपलब्धीच्या विविध पर्यायांवर भविष्यात ही अशी चाचपणी सुरू राहणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

भांडुप व पांजरापूर येथे प्रकल्प उभारणी :

१) मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला होत असल्याचा दावा पालिका जल विभागाकडून करण्यात येतो. 

२) मात्र पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २५ ते ३० टक्के म्हणजेच सुमारे साडेआठशे ते ९०० दशलक्ष लिटर पाणीचोरी व गळतीमुळे वाया जाते. त्यामुळे प्रत्यक्षात मुंबईची तहान भागविण्यासाठी फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होत असतो. 

३) सध्या पालिकेकडून भांडूप, पांजरापूर येथे जलशुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. याचसोबत तुळशी येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी चाचपणी पालिकेने सुरू केली आहे.

मसुदा निविदा तयार करण्याची तयारी :

या पार्श्वभूमीवर नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी मसुदा निविदा तयार करण्याची तयारी पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. पालिकेकडून सुरुवातीला यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून, यांच्याकडून पालिका आवश्यक ते सर्वेक्षण करून घेणार आहे.

Web Title: the capacity of tulsi water treatment plant will increase process of appointment of consultant started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.