'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:31 IST2025-10-17T20:28:33+5:302025-10-17T20:31:30+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray BJP: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीवर भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपने राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत व्हिडीओच पोस्ट केला आहे.

'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
उद्धव ठाकरेंकडे मुंबई महापालिकेची सत्ता गेली तर खान म्हणजे मुस्लीम महापौर होईल, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी याबद्दल एक विधान केले होते. त्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून टीका झाली. याच टीकेला अमित साटम यांनी राज ठाकरेंचा व्हिडीओ दाखवत उत्तर दिले आहे. 'बघा रे व्हिडीओ', असे म्हणत अमित साटम यांनी राज ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात अमित साटम यांनी महापौरबद्दलचे हे वक्तव्य केले होते. या विधानावरून राजकारण चांगलेच तापले. पण, १७ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे मनसेच्या दिपोत्सवासाठी गेलेले असतानाच अमित साटम यांनी राज ठाकरेंचा व्हिडीओ पोस्ट केला.
राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल काय बोललेले?
"बघा रे व्हिडीओ. मुंबईकरांनो सावधान, उबाठाची सत्ता आली तर 'खान' महापौर होईल", असा मजकूर असलेला हा व्हिडीओ आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ असून त्यात ते म्हणत आहेत, "एक घोषवाक्य चालायचं की, बाण हवा की खान आणि दुर्दैव असं की आज उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरलेत फक्त खान."
बघा रे हा व्हिडिओ! pic.twitter.com/YObfQBzexj
— Ameet Satam (@AmeetSatam) October 17, 2025
अमित साटम यांचे विधान काय?
"वर्सोवा किंवा मालवणीमध्ये दिसलेल्या पॅटर्नमुळे शहर उद्ध्वस्त होऊ शकते. जर शिवसेना उबाठा सत्तेत आली, तर एक खान या मुंबईचा महापौर होईल. पण आता ते होऊ देणार नाही", असे अमित साटम म्हणाले होते.