'ती' रुग्णवाहिका होती पेशंटविनाच; अमित शाह यांच्या ताफ्याबाबत व्हायरल व्हिडीओचे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 11:20 IST2022-09-08T11:19:47+5:302022-09-08T11:20:44+5:30
वाहतूक पोलिसांचे ट्विट

'ती' रुग्णवाहिका होती पेशंटविनाच; अमित शाह यांच्या ताफ्याबाबत व्हायरल व्हिडीओचे सत्य
मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यामुळे अंधेरी परिसरात एक रुग्णवाहिका अडली असल्याचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. मात्र, वस्तुस्थिती तशी नसून त्या रुग्णवाहिकेत पेशंट नव्हता तसेच सायरन सदोष असल्याने तो सतत वाजत होता, असे चौकशीत निष्पन्न झाल्याचे वाहतूक पोलिसांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांचे म्हणणे.....
वाहतूक पोलिसांनी व्हिडीओ संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. रुग्णवाहिकेचा सायरन तांत्रिक दोषामुळे वाजत होता आणि बोर्डवर आपत्कालीन रुग्ण असा उल्लेखही नव्हता. त्या रुग्णवाहिकेत पेशंट ही नव्हता, असे स्पष्टीकरण देणारे हिट वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये काही तथ्य नसल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत रुग्णवाहिका चालकाचा जबाब पोलीस नोंदविणार असल्याचे समजते.
काय होते व्हिडीओत?
अमित शहा यांच्या गाड्यांच्या तापयाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसारित झाला. त्यात शहांच्या गाडीचा ताफा जाताना ट्रॅफिकमध्ये एक रुग्णवाहिका अडकलेली दिसते. पाच ते दहा मिनिटे सायरन वाजत असूनही रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास जागा मिळू शकत नाही, असे व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक जणांनी कमेंट करत टीका केली.