कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 07:15 IST2025-12-06T07:13:54+5:302025-12-06T07:15:10+5:30
गेल्या काही दिवसांपासून वरळीतील रेजिस हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क कोणत्या संघटनेकडे असावा यावरून वाद सुरु आहे.

कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
मुंबई : वरळी येथील पंचतारांकित सेंट रेजिस हॉटेलमध्ये कामगारांच्या संघटनेची मान्यता व युनियनच्या वर्चस्वावरून उद्धवसेना - भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून वरळीतील रेजिस हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क कोणत्या संघटनेकडे असावा यावरून वाद सुरु आहे. यातच भाजपप्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेने लावलेला फलक भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून फाडला. त्यामुळे उपस्थित भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळातच प्रकरण हातघाईवर गेले.
दोन्हीकडून आरोप
भाजपने बेकायदेशीररीत्या युनियन निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाकासेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. उद्धवसेना कामगारांच्या प्रश्नांवर लढण्यात अपयशी ठरल्याने कामगार स्वतःहून आमच्याकडे येत आहेत, असे भाजपप्रणित संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.
गेली १० ते १५ वर्ष येथे आमच्या मान्यताप्राप्त युनियनचे ७०० ते ८०० कामगार सदस्य आहेत. कोर्टातून मान्यता मिळालेली आमची युनियन आहे. भाजपने अनेक वेळा या युनियनमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रीतसर व कायदेशीर मार्गाने युनियन करण्याऐवजी प्रशासनाचा वापर करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अखेर आमची ताकद दाखविण्याची वेळ आणल्याने त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दयावे लागले. - निशिकांत शिंदे, सहचिटणीस, भारतीय कामगार सेना
युनियन काढण्याचा अधिकार सर्वानाकामगारांच्या हितासाठी कोणत्याही पक्षाने युनियन काढावी. तो अधिकार सगळ्यांनाच आहे. पण, कोणत्याही पक्षाने आस्थापना बंद करणे, राडा घालणे असा पारकर केला असेल तर त्याची माहिती घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री