अदानींविरोधात ठाकरे गटाचा महामोर्चा, या आहेत प्रमुख मागण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 03:51 PM2023-12-16T15:51:07+5:302023-12-16T15:51:55+5:30
Dharavi MahaMorcha: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाकडे देण्याच्या निर्णय़ाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या महामोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या महामोर्चासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाकडे देण्याच्या निर्णय़ाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या महामोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या महामोर्चासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या महामोर्चाला उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या काही मागण्या समोर येत आहेत. त्यापैकी धारावीचा पुनर्विकास हा अदानी उद्योग समुहाकडून करून घेण्याऐवजी तो स्वत: सरकारने करावा, ही प्रमुख मागणी आहे.
ठाकरे गटाने आयोजित केलेल्या या महामोर्चामध्ये लाखो शिवसैनिक आणि प्रकल्पाविरोधातील धारावीकर सहभागी होण्याची शक्यता आहे. या महामोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये धारावीच्या टीडीआरसाठी सकरारने स्वत:ची कंपनी नेमून द्यावी. धारावीमधील सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून धारावीतच त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याबरोबरच निवासी झोपडीधारकांनां ५०० चौरस फुटांपर्यंतचं घर मोफत द्यावं. तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या धारावीत असलेल्या चाळी आणि बिल्डिंगमधील रहिवाशांना ७५० चौफुटांचं घर मोफत देण्यात यावं.
धारावीतील झोपडपट्ट्यांमधून अनेक छोटेमोठे व्यवसाय चालतात. त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. तसेच धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने सर्वेक्षण करून, निवासी, अनिवासी रहिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्पाला सुरुवात करावी, तसेच प्रकल्पाचं स्वरूप समजावं यासाठी मास्टर प्लान आधीच जाहीर करून सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा होताना आम्हाला दिसतोय. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील टीडीआर प्रकल्प आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे फार मोठे कारस्थान आहे. गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली होती.