Thackeray Group MP Sanjay Raut News: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महायुती सरकारनेही चांगले काम केले आहे. अटल सेतू हा एक चमत्कारच आहे. अनेक क्षेत्रात मोठी कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातुल जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत तर दिलेच पण, ‘कौनसी सेना असली, कौनसी एनसीपी असली’ हा निकालही दिला, असे अमित शाह म्हणाले. तर, एकनाथ शिंदे यांनीही अमित शाह यांच्याबाबत कौतुकोद्गार काढताना लोहपुरुष उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह लोहपुरूष मग सरदार वल्लभभाई पटेल कोण?, बाळासाहेब ठाकरे कोण? ‘वो डरा हुआ आदमी’, असा पलटवार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. सत्तेतील मंडळी ही लाचार आणि डरपोक आहे. अमित शाह सत्तेत नसतील तेव्हा खरी शिवसेना कोणती आणि खोटी कोणती हे कळेल. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष आणि चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरावे आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे, असे आव्हान संजय राऊतांनी दिले.
एकनाथ शिंदे अटकेच्या भीतीने बेळगावला जात नाहीत
कर्नाटकमध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळ म्हणजेच एसटीच्या बसवर हल्ला करण्यात आला. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घेत, चर्चेतून त्यावर तोडगा काढावा. हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीची जबाबदारी असताना अटकेच्या भीतीने ते बेळगावला जात नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात घुसून त्यांनी चोऱ्यामाऱ्या करत पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला अमित शाह यांची दादगिरी दाखवू नका. ते काही अमृत पिऊन आले नाही. जनता त्यांचा फैसला करेल, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.