Join us

“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:22 IST

Sanjay Raut News: आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्‍यंत्र गुजरातच्या भूमीवरून सुरू आहे. मराठीच्या हितासाठी एकत्र आले नाही, तर मुंबई आपल्या हातात राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut News: विवाह, साखरपुडा, मधुचंद्र या जुन्या संज्ञा आहेत. मुंबईवर अदानींचे अतिक्रमण सुरू आहे. अदानी व शेठजी आक्रमण करत आहेत. दिल्लीसह गुजरातच्या भूमीवरून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे, मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. मुंबई फुकटात अदानींच्या घशात घातली जात आहे. विद्यमान सरकार महाराष्ट्राचे हित पाहत नाही. त्यामुळे मला वाटते की, दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवले पाहिजे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, एक फोन अन्..."

पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मदर डेअरीचा भूखंड गेला, अख्खी धारावी गेली. ही मुंबई १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली आहे. मराठी माणसाचा विचार घेऊन राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभे केले आहे. प्रकाश आंबेडकरही यावर बोलत आहेत. या सर्वांनी आता एकत्र यायला पाहिजे. अन्यथा मुंबई आपल्या हातात राहणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार

आमचे नेते मनसेबरोबरच्या युतीबाबत एका सुरात बोलत आहेत. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि आम्ही सर्वजण एका सुरात बोलत आहोत. त्यावर कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. आम्ही महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे पाच खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत संजय राऊतांना विचारले असता, या खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. मुळात प्रसारमाध्यमांना अशी माहिती कोण देत आहे? मी जर म्हटले की, शिंदेंचे सहा खासदार भाजपाच्या संपर्कात आहेत. शिंदेंचे २२ आमदार अजित पवारांच्या गटात जाणार आहेत आणि उरलेले आमदार गिरीश महाजन आपल्या खिशात घेऊन फिरतात आहेत. माझ्याकडे सूत्रांची पक्की माहिती आहे, असा पलटवार संजय राऊतांनी केला.

 

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामनसेराज ठाकरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाउद्धव ठाकरे