एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले, “घरगडी असते तर मंत्री केले असते का”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 14:17 IST2025-02-14T14:17:16+5:302025-02-14T14:17:25+5:30
Thackeray Group MP Sanjay Raut News: राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावरून संजय राऊतांनी टीका केली.

एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले, “घरगडी असते तर मंत्री केले असते का”
Thackeray Group MP Sanjay Raut News: सरहदच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उपमुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांवर टीका केली. या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, एकनाथ शिंदेनी उठाव वगैरे काही केला नाही. ते ईडीला, सीबीआयला घाबरून पळालेत. ते जर घरगडी असते तर त्यांना आमदार केले असते का? तर त्यांना इतकी वर्ष मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली असती का? घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखे महत्त्वाचे खाते दिले असते का? मुख्यमंत्री हे कधीच नगरविकास खाते सोडत नाही, जे नगरविकास खाते मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे, ते उद्धव ठाकरे यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्याला म्हणजे एकनाथ शिंदेंना दिले. एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सत्ता गेल्यावर तडफडत राहतो, त्याला शिवसैनिक म्हणत नाहीत
राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावरही संजय राऊतांनी निशाणा साधला. सत्ता गेल्यावर जो माणूस तडफडत राहतो, त्याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाहीत. राजन साळवी स्वत:ला कडवट शिवसैनिक म्हणत होते, पण ते तसे नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे अनेक काळ सत्तेशिवाय राहिले. त्यांच्यासोबत आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिलो. आम्ही कधी आमदार, खासदार होऊ असे आम्हाला स्वप्नात सुद्धा कधी वाटले नव्हते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यातला बराच काळ सत्तेशिवाय काढला. आम्हाला सत्ता फार उशीरा मिळाली. आमच्याकडे सत्ता नसतानासुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलो आणि यापुढेही राहू. सत्ता हे सर्वस्व नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संकटकाळात नेत्यासोबत, पक्षासोबत राहिले पाहिजे, तुमचे पक्षातील मतभेद नंतर दूर करता येतील. पक्ष सोडून जाण्याची तुम्ही काहीही कारणे देत आहात. शिवसेना या चार अक्षरांमुळे तुम्हाला राजन साळवी म्हणून किंमत आहे. तुम्हाला पक्षाने नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार केले नसते, तर कोण राजन साळवी? तुम्हाला कोणी ओळखले असते ? ते काय किंवा इतर कोणीही काय, अगदी संजय राऊत यांची ओळख काय ? आमच्यामागे शिवसेना ही चार अक्षरे आहेत म्हणून आम्ही आहोत, असे संजय राऊतांनी नमूद केले.