Thackeray Group MP Sanjay Raut News: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याला राज्यातील सात शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईत मराठीत पाहिजे यामध्ये कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नसल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका कुणापासून असेल तर हिंदीपासून नाही तर गुजरातीपासून आहे. लक्षात घ्या की, मराठी आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका गुजराती लॉबीपासून आहे. संपूर्ण पश्चिम मुंबईचे गुजरातीकरण करण्यात आले आहे. भाजपाला वाईट वाटेल म्हणून त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही. या मुद्दावर कॅफेत चर्चा होत आहे का? अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
हा वाद पालिका निवडणुकीसाठी सुरू
हिंदी सक्तीचे शैक्षणिक धोरणा पुरते मर्यादित आहे. परंतु हा वाद पालिका निवडणुकीसाठी सुरू आहे. घाटकोपरची भाषा गुजराती सांगतात, तेव्हा हे का बोलत नाही. भाषेची सक्ती करायाची नाही, दक्षिणेतील राज्यकर्ते हे कटवट आहे. परंतु आमचे राज्यकर्ते गुलाम आहेत. राज ठाकरे हे अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी कोणत्या भाषेत बोलतात. शिंदे आणि त्यांची टोळी कोणत्या भाषेत शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलतात. ज्यांचे इंग्रजीचे वांदे आहेत, त्यांना हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मराठी ही आई आहे तर इतर भाषा मावश्या आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हे सर्व ठरवून चालले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी कोणता वाद निर्माण करता येईल, याच्यावर ‘कॅफे’ मध्ये खल झाला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तत्पूर्वी, संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता सागर बंगल्यावरून भाषिक वादासाठी सूत्र फिरल्याचा दावा केला होता. तर आता मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी, हिंदी आणि इतर भाषांचा वाद घालण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.