Join us

“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:29 IST

Thackeray Group News: महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही हात पुढे केलेला आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे.

Thackeray Group News: मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यभरातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मतदान होऊ शकते, असा कयास आहे. एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असताना पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता राज ठाकरे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, आम्ही मनसेबरोबरच्या युतीसाठी सकारात्मक असून आम्ही तसा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी ठरवाचे आहे की कोणाशी युती करायची आणि कोणाशी युती करायची नाही. त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा, असे परब यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरे यांनी युतीचा निर्णय घ्यायचा आहे

कोणाशी युती करायची हे मनसेच्या प्रमुखांनी ठरवायचे आहे. राज ठाकरे यांनी युतीचा निर्णय घ्यायचा आहे. राज ठाकरे यांना वाटले की, आमच्यासोबत युती झाली पाहिजे. त्यानंतर आम्ही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. आता राज ठाकरे यांनी युतीबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. कोणाशी युती करायची आणि कोणाशी नाही हे त्यांनी ठरवावे. आम्हाला वाटले की, राज ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी बोलले आणि आम्ही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती करावी, भाजपाबरोबर युती करावी आणि त्यातून राज्याचे हित साधले जाईल असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. तो त्यांचा प्रश्न आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आमच्याबाजूने चर्चेची दारे खुली आहेत. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, काही मतभेद असतील, तर ते बाजूला ठेवायला तयार आहे. आमचा हात आम्ही पुढे केलेला आहे. जसा निवडणुकीसाठीचा काळ पुढे जाईल, तसे दोन्ही पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल. दिलेल्या प्रतिसादावरून आम्ही घुमजाव केलेले नाही. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही हात पुढे केलेला आहे, असेही अनिल परब यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :अनिल परबराज ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनामनसेमुंबई महापालिका निवडणूक २०२५