“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:36 IST2025-11-01T11:35:01+5:302025-11-01T11:36:54+5:30
Aaditya Thackeray: उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
Aaditya Thackeray: उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. बाहेर जाण्यास व गर्दीत मिसळण्यापासून काही दिवस दूर राहण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे, अशी माहिती स्वतः राऊत यांनी सोशल मीडियावरून दिली. यानंतर अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी, तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. यातच संजय राऊत यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली.
प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस
काळजी घे संजय काका, प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस! आत्ताही तेच होईल, खात्री आहे!, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. संजय राऊत हे शिवसेनेतला महत्त्वाचा चेहरा आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग असो किंवा आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे असो या सगळ्यांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुखमैदान तोफ असा संजय राऊत यांचा लौकिक आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत. अशातच संजय राऊतांची प्रकृती अगदीच चिंताजनक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या प्रकृतीत काही गंभीर समस्या असल्याचे समोर आले. त्यावर उपचार सुरू असून, यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणे, गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नाइलाज असला तरी ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षात भेटीस येईन, असे संजय राऊत यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
काळजी घे संजय काका,
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 31, 2025
प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस!
आत्ताही तेच होईल, खात्री आहे!@rautsanjay61https://t.co/NaG9dGdtsT