मविआचा १ नोव्हेंबरचा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, कोण-कोण सहभागी होणार? महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:45 IST2025-10-30T14:43:12+5:302025-10-30T14:45:31+5:30
Maha Vikas Aghadi Morcha: मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. यात मनसे सहभागी होणार असून, हा मोर्चा कधी निघेल, कोणता मार्ग असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

मविआचा १ नोव्हेंबरचा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, कोण-कोण सहभागी होणार? महत्त्वाची माहिती
Maha Vikas Aghadi Morcha: मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडीने १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, यामध्ये मनसेही सहभागी होणार आहे. हा मोर्चा कुठून सुरू होणार, कुठे संपणार, कोण-कोण सहभागी होणार, किती वाजता निघणार, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शनिवार, ०१ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेसमोर जावे, यासाठी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार मोर्चात सामील होतील. मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली.
राज ठाकरे आणि मविआ नेते मार्गदर्शन करणार
शरद पवार मोर्चाला उपस्थित राहणार असून, मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी १ ते ४ या वेळेत मोर्चा निघणार आहे. आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळावा. आम्ही मतचोरीचा बारकाईने अभ्यास करतो. मतदार यादीतील घोळ दूर करा. आम्ही घेतलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आघाडीचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील. मोर्चाला मार्गदर्शन करतील. केवळ राजकीय पक्ष नाही तर ज्यांना आपले मत चोरीला गेले, असे वाटते आणि ज्या चुकींच्या मतावर सरकारमध्ये बसले असे वाटते ते लोकही मोर्चात सहभागी होतील, असे परब म्हणाले.
दरम्यान, पोलिसांना भेटलो. सूचना घेतल्या. मोर्चाचे रुट प्रसिद्ध केले आहेत. उद्या क्यूआर कोड पाठवू. म्हणजे लोकांची व्यवस्था होईल. मुंबईवरून येणाऱ्या दोन लोकांची वाहन व्यवस्था राहील. मतचोरीबाबत प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील, असे त्यांनी सांगितले.